• Thu. Aug 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात यांचा हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनतर्फे गौरव

ByMirror

Jun 6, 2026
पर्यावरण दिनानिमित्त वृक्षसंवर्धन, स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

समाजसेवा आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी केलेल्या कार्याचे कौतुक


पर्यावरण दिनानिमित्त वृक्षसंवर्धन, स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईनचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात यांच्या सामाजिक कार्याबद्दल हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. समाजातील वंचित, दुर्बल, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. यावेळी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्या प्रमुख निर्मलाताई केदारी होत्या. त्यांच्या हस्ते थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे पदाधिकारी, नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अध्यक्षीय भाषणात निर्मलाताई केदारी यांनी प्रकाश थोरात यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या की, समाजातील गरजू, वंचित आणि अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी थोरात यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. समाजहितासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया अधिक बळकट होत असते. अशा व्यक्तींचा सन्मान करणे म्हणजे समाजसेवेच्या मूल्यांचा गौरव करण्यासारखे असल्याचे त्यांनी नमूद केले.


यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलताना निर्मलाताई केदारी यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल आणि पाणीटंचाई यांसारख्या समस्या संपूर्ण जगासमोर गंभीर आव्हान म्हणून उभ्या राहिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी आपली जबाबदारी ओळखणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, प्लास्टिकचा वापर कमी करावा, पाणी आणि विजेची बचत करावी तसेच स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.


सत्काराला उत्तर देताना प्रकाश थोरात यांनी हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशन व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्यांनी आपल्या मनोगतात संविधानिक मूल्यांचे महत्त्व, सामाजिक न्यायाची आवश्‍यकता, शिक्षणाची भूमिका आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी याविषयी मार्गदर्शन केले. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी युवकांनी पुढाकार घेत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *