• Wed. Jun 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरच्या सीए शंकर अंदानी यांचा साहित्यविश्‍वात विक्रमांचा पंचमहायज्ञ; एकाच दिवशी पाच जागतिक विक्रमांची नोंद

ByMirror

Jun 3, 2026
लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून गौरव

104 स्वलिखित पुस्तके, 12 हजारांहून अधिक कविता आणि देशातील शेकडो कवींच्या सहभागातून उभा राहिला साहित्यिक विक्रम


लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंदी व मराठी साहित्य क्षेत्रात अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत अहिल्यानगरचे सुपुत्र तथा प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सीए शंकर घनश्‍यामदास अंदानी यांनी एकाच दिवशी पाच जागतिक विक्रमांची नोंद आपल्या नावावर करत साहित्यविश्‍वात नवा इतिहास रचला आहे. साहित्य निर्मिती, कविता संकलन आणि विक्रमी प्रमाणात पुस्तक प्रकाशन या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे.


सीए अंदानी यांनी एकाच दिवशी तब्बल 104 स्वलिखित पुस्तके प्रकाशित करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या 12 हजार 100 हून अधिक कवितांचे विविध पुस्तकांद्वारे प्रकाशन करण्यात आले असून हा देखील एक स्वतंत्र जागतिक विक्रम म्हणून नोंदविण्यात आला आहे. ‘माँ की ममता’ आणि ‘माँ अनेकता की शक्ति’ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या हिंदी काव्यसंग्रहात देशभरातील 140 कवींच्या कविता संकलित करण्यात आल्या आहेत. आई या विषयावर इतक्या मोठ्या प्रमाणात काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा करण्यात येत आहे. विविध राज्यांतील कवींच्या रचनांना एकत्रित आणून तयार करण्यात आलेला हा काव्यसंग्रह हिंदी साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.


याचबरोबर ‘वडील : बाबा अबोल जीवनाचे कोडे’ या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील 80 कवींच्या 1161 कवितांचे संकलन करून मराठी भाषेतील एक भव्य काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच ‘बहिण माझी प्रिय ताई’ या नावाने बहिणीवरील 1161 कवितांचे स्वतंत्र संकलनही प्रकाशित करण्यात आले आहे. कुटुंबव्यवस्थेतील नातेसंबंधांवर आधारित हे साहित्यिक उपक्रम विशेष ठरत आहेत.


साहित्य क्षेत्रातील या विक्रमी कार्याबद्दल सीए अंदानी यांच्या नावावर एकाच दिवशी पाच जागतिक विक्रमांची नोंद करण्यात आली. या विक्रमांच्या प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा पुणे येथील पत्रकार भवन ऑडिटोरियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्‍वर आचार्य डॉ. कृष्णदेव गिरी महाराज होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश पांडेय, सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनारसे, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्सचे बाबी करनानी, अभिजीत जोशी, पद्मश्री भिकू रामजी इदाते, पद्मश्री डॉ. उदय देशपांडे, पद्मश्री चैत्रम पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


आचार्य डॉ. कृष्णदेव गिरी महाराज म्हणाले की, हा सोहळा केवळ एका व्यक्तीच्या सन्मानाचा नसून साहित्य, समाजसेवा आणि अथक परिश्रम यांच्या गौरवाचा सोहळा आहे. सीए शंकर अंदानी यांनी केलेले कार्य पाहिले तर त्यामागे अपार मेहनत, निष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. एकाच दिवशी 104 पुस्तके प्रकाशित करणे, हजारो कविता लिहिणे, शेकडो कवींच्या रचनांचे संकलन करणे आणि साहित्य क्षेत्रात पाच जागतिक विक्रम प्रस्थापित करणे हे अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद कार्य आहे. हे केवळ संख्येचे यश नाही, तर साहित्य संवर्धनाची एक मोठी चळवळ आहे. विशेष म्हणजे त्यांनी आई, वडील आणि बहिण यांसारख्या भारतीय संस्कृतीतील पवित्र नात्यांवर आधारित काव्यसंग्रह प्रकाशित करून समाजाला संस्कारमूल्यांची आठवण करून दिली आहे. साहित्याच्या माध्यमातून कुटुंबव्यवस्था, मानवी मूल्ये आणि सामाजिक ऐक्य जपण्याचा आणि संस्कार रुजविण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी देखील सीए अंदानी यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.


सीए अंदानी हे केवळ साहित्यिकच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मंदिरे, मस्जिदी, चर्च, धर्मशाळा आणि विविध सामाजिक संस्थांसाठी अत्यल्प मानधनात किंवा विनामूल्य लेखा व करसल्लागार सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. 2022 मध्ये 364 धार्मिक व सामाजिक संस्थांचे आर्थिक व करसल्लागार कामकाज केल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांची स्वतंत्र विक्रम नोंद केली होती.


त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक योगदानाची दखल घेत अमेरिका येथील विविध संस्थांकडून त्यांना ‘मेडल ऑफ एक्सलन्स’सह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत त्यांना सुमारे 3180 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून 115 जागतिक विक्रमांची नोंद आणि 150 मानद डॉक्टरेट पदव्यांचा बहुमान त्यांना मिळाल्याचे सांगण्यात आले.


व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले सीए शंकर अंदानी यांनी श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे तब्बल 18 वर्षे करसल्लागार म्हणून सेवा बजावली आहे. तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेसह विविध शासकीय संस्था, बँका, पतसंस्था आणि सामाजिक संस्थांचे लेखापरीक्षक व करसल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या या जागतिक विक्रमाबद्दल शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार सुधीर तांबे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *