संमेलनासाठी लेखक, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक सुनील मोंढे व प्रेरक वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अमोद नलगे राहणार उपस्थित
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी, लेखक आणि नवोदित प्रतिभावंतांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. राजेश कावरे यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनासाठी लेखक, नाशिक येथील चित्रपट निर्माता व दिग्दर्शक सुनील मोंढे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख व प्रेरक वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अमोद नलगे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्य, सामाजिक जाणीव, सांस्कृतिक परंपरा आणि नव्या पिढीतील साहित्यिकांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशी माहिती संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
ग्रामीण भागात अनेक प्रतिभावंत लेखक, कवी आणि साहित्यिक आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील वास्तव, प्रश्न, संघर्ष, ग्रामीण संस्कृती आणि मानवी संवेदनांचे दर्शन घडवत असतात. मात्र, त्यांना आपले साहित्य सादर करण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पुरेशी व्यासपीठे उपलब्ध होत नाहीत. ही उणीव भरून काढण्याबरोबरच ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीला व्यापक स्वरूप देण्याच्या हेतूने या संमेलनाची परंपरा जपली जात आहे. आयोजित करण्यात येणारे हे नववे संमेलन ग्रामीण साहित्यप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे.
या संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच अन्य क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात येणार आहे. महिलांच्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या योगदानातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा या गौरवामागील प्रमुख उद्देश आहे.
ग्रामीण भागातील दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, निसर्गाचे बदलते स्वरूप आणि ग्रामीण जनजीवनातील संघर्ष यांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडण्यासाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रतिसाद देणाऱ्या कवींच्या साहित्यकृतींचा गौरव संमेलनात करण्यात येणार असून, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
संमेलनादरम्यान ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर परिसंवाद व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य आणि समाज यांचे परस्परसंबंध, ग्रामीण संस्कृतीचे जतन, बदलते ग्रामीण जीवन, सामाजिक प्रश्न, साहित्यिकांची जबाबदारी आणि नव्या पिढीसमोरील आव्हाने अशा विविध विषयांवर विचारमंथन घडवून आणले जाणार आहे.

