पारंपरिक नृत्यांनी वेधले लक्ष; गुणवंतांचा गुणगौरव
बिरसा मुंडा यांना अभिवादन; रानकवी तुकाराम धांडे यांच्या कवितांनी रंगला सांस्कृतिक सोहळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगरच्या वतीने सावेडी उपनगरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि समाजाच्या हक्कांविषयी जनजागृती घडवून आणणाऱ्या भव्य सांस्कृतिक मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव, महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य सांस्कृतिक मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, भिस्तबाग महाल मार्गे ही मिरवणूक श्रेयस लॉनपर्यंत काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी युवक-युवती, महिला आणि समाजबांधवांच्या सहभागामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. मिरवणुकीदरम्यान आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे कमाडावना नृत्य, टिपऱ्या नृत्य, कांबड लोकनृत्य, फुगडी यांसह विविध पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वाद्ये, वेशभूषा आणि लोककलेच्या सादरीकरणामुळे परिसरात आदिवासी संस्कृतीचा जागर झाला.
मिरवणुकीचा समारोप भिस्तबाग महाल शेजारील श्रेयस लॉन येथे झाला. आदिवासी समाजाचे महानायक आणि स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे यांनी आदिवासी कविता आणि निसर्ग कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात विद्यार्थी, नारीशक्ती, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून नावलौकिक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा सन्मान करून समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणातून आदिवासी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिनाथ गवारी यांनी आदिवासी समाजासमोरील भविष्यातील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाने शिक्षण, रोजगार, सामाजिक विकास आणि हक्कांच्या जाणीवेसाठी एकजुटीने पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उपस्थितांचे आभार प्रतिष्ठानचे गोंदके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिल्यानगरसह राहाता, अकोले, पाथर्डी, नेवासा, राहुरी, पारनेर, शेवगाव, संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आदिवासी समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश शेळके, आदिनाथ भांगरे, हेमंत घोडे, नितीन साबळे, देवराम पिचड, हनुमंत सोनवणे, संतोष नवले, धोंगडे साहेब, पाथवे, तुकाराम भांगरे, एकनाथ घोडे, नवनाथ बांबेरे तसेच आदिवासी सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

