नेत्र तपासणी शिबिर, नेत्रदान, अवयवदान जनजागृतीत योगदानाची दखल
महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या विचारांचे बोरुडे यांचे निस्वार्थ कार्य -मा.आ. ऋतुराज पाटील
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा ‘नेत्रदूत’ म्हणून ओळख असलेले जालिंदर बोरुडे यांना कोल्हापूर येथील सत्यशोधक प्रागतिक मंच निर्मिती विचार मंचच्या वतीने ‘महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-2026’ प्रदान करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूरचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते बोरुडे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास कोल्हापूरचे उपमहापौर भुपाल शेटे, मंचाचे अध्यक्ष आदित्य म्हमाने, सचिव अंतिमा कोल्हापूरकर, डॉ. वसंत भागवत, डॉ. मिनल राजहंस, इंजि. अभिजीत कांडेकर, इंजि. यश घोगरे, इंजि. सौरभ बोरुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ऋतुराज पाटील म्हणाले की, “जालिंदर बोरुडे यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने नेत्रसेवा करत हजारो लोकांना नवजीवन दिले आहे. फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य हे खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी अशा प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व अत्यंत दुर्मिळ असल्याचे त्यांनी सांगित
कोल्हापूरचे उपमहापौर भुपाल शेटे म्हणाले की, जालिंदर बोरुडे यांचे कार्य हे समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अधिकाधिक युवकांनी सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तब्बल 34 वर्षांपासून सातत्याने नेत्रसेवा कार्य सुरू ठेवले आहे. त्यांनी स्वखर्चाने विविध शिबिरे आयोजित करून हजारो गरजू आणि नेत्रदोष असलेल्या रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी दिली आहे. याशिवाय त्यांनी नागरिकांमध्ये मरणोत्तर नेत्रदानाची जागृती करून अनेकांकडून नेत्रदान घडवून आणले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रमही सातत्याने राबविले जात आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला असून, सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
