• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव

ByMirror

May 29, 2026
‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव

आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांनी केला सत्कार; सामाजिक व शैक्षणिक कार्याचा सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे सन 2024-25 या वर्षासाठी प्रदान करण्यात आलेला जिल्हास्तरीय ‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संगीता मालकर यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने शहर बँकेचे व्हाइस चेअरमन तथा श्री विशाल गणपती मंदिराचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते यांनी सत्कार केला.


या सत्कार समारंभाप्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, शिवाजी घाडगे, कारभारी गरड, चंद्रकांत सोनार यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व बँकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी संगीता मालकर यांना श्री विशाल गणेशाची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, संगीता मालकर या महिला सक्षमीकरणासाठी निस्वार्थ भावनेने काम करत आहे. केवळ शिक्षिका म्हणून नव्हे, तर समाजातील वंचित, गरजू आणि एकल महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ हा केवळ पुरस्कार नसून समाजसेवा, स्त्री सक्षमीकरण आणि लोकहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान आहे. हा पुरस्कार संगीता मालकर यांना मिळणे म्हणजे त्यांच्या अनेक वर्षांच्या समर्पित कार्याची पावती आहे. त्यांनी शिक्षक गुणगौरव पुरस्कारातून मिळालेली मोठी रक्कम गरजू महिलांसाठी शिवणयंत्रे खरेदी करून खर्च केली. ही बाब त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांना नवे आयुष्य मिळाले असून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.


संगीता मालकर या कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून गेल्या 36 वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षणाबरोबरच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. त्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा असून ‘साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य’च्या तालुका समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत.


तालुक्यातील एकल महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिलाई मशीनचे वाटप, शेळीपालनासाठी शेळ्यांचे वितरण, आरोग्य शिबिरे, सॅनिटरी नॅपकिन वितरण तसेच गरजू कुटुंबांना कडधान्यांचे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप उपलब्ध करून देत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.


बालकांच्या सक्षमीकरणासाठीही त्यांनी सातत्याने कार्य केले असून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जाणीवा निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांना प्राप्त झालेल्या शिक्षक गुणगौरव पुरस्कारातून मिळालेली एक लाख दहा हजार रुपयांची रक्कम स्वतःसाठी खर्च न करता त्यांनी गरजू महिलांना शिवणयंत्रे देण्यासाठी वापरली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही नुकताच त्यांचा विशेष गौरव केला आहे. त्यांना तब्बल तीन महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. नुकतेच मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *