• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

समर्पण संस्थेने गरजू कर्णबधीर विद्यार्थ्यांना दिली श्रवणयंत्राची दिवाळी भेट

ByMirror

Oct 28, 2024
समर्पण संस्थेने गरजू कर्णबधीर विद्यार्थ्यांना दिली श्रवणयंत्राची दिवाळी भेट

श्रवणयंत्राने होणार शिक्षणाची सोय

दिव्यांगांचे जीवन ज्ञानाने प्रकाशमान करण्याचा उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या महिलांच्या समर्पण सेवा संस्थेच्या वतीने कर्णबधीर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिवाळीनिमित्त श्रवणयंत्राची भेट देण्यात आली. दुर्दैवाने आलेले दिव्यांगत्व व त्यात गरिब कुटुंबाची असलेली हालाखिची परिस्थितीमध्ये कर्णबधीर असलेल्या दिव्यांग मुलांच्या अंगणात दिवा प्रज्वलीत करुन त्यांचे जीवन ज्ञानाने प्रकाशमान करण्याचा उपक्रम समर्पणच्या वतीने शहरातील जानकीबाई आपटे मूकबधीर विद्यालयात राबविण्यात आला. तर या मुलांची दिवाळी गोड करुन त्यांना चॉकलेट, मिठाई व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.


या दिव्यांगांसाठी राबविण्यात आलेल्या दिवाळी भेट कार्यक्रमाप्रसंगी मूकबधीर विद्यालय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी, यशवंत पानसरे, मुख्याध्यापक विजय आरोटे, समर्पण सेवा संस्थेच्या अध्यक्षा रूपा पंजाबी, शशी आनंद, सुनीता सहानी, हेमा बस्सी, रोली जोहरी, सरोज गुरली, पूनम खुल्लर, रेखा पावा, किरण छाबडा, किरण खोसला, शोभा खन्ना, सुमन सहानी, कोमल सहानी, अंकिता जग्गी, मंजु अरोरा, मीना सूद, वर्षा तलवार, ईशा तलवार, बिना बतरा, अंजु मल्होत्रा, वसंत वधवा, सोनिया कुंद्रा, किट्टू गोयल, भाग्यरेखा पिंपळकर, डॉ. वंशिका पंजाबी, राधा पंजाबी आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या, शिक्षक व कर्णबधीर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रूपा पंजाबी म्हणाल्या की, दिव्यांग विद्यार्थी समाजातील एक घटक असून, या विद्यार्थ्यांना दिशा दिल्यास ते चांगले नागरिक म्हणून घडू शकणार आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. दिवाळी हा इतरांच्या जीवनात आनंद व प्रकाश निर्माण करणारा सण आहे. वंचितांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्याध्यापक विजय आरोटे म्हणाले की, सामाजिक संवेदना जागृक ठेऊन समर्पण संस्थेच्या महिला सामाजिक योगदान देत आहे. कर्णबधीर असलेल्या विद्यार्थ्यांना ऐकू येत नसल्याने ते प्रतिसाद देत नाही व बोलूही शकत नाही. त्यांना लहानपणीच आवश्‍यक श्रवणयंत्र उपलब्ध झाल्यास ते उत्तमप्रकारे प्रतिसाद देतात. काही कर्णबधीर असलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्यांना महागडे श्रवणयंत्र घेणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना सर्मपण ग्रुपचे श्रवणयंत्र उपलब्ध करुन त्यांना शिक्षणासाठी पाठबळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


दारिद्य्ररेषेखालील सहा मुलांची निवड करून त्यांना उत्तम दर्जाचे श्रवणयंत्र भेट देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पणत्या देऊन संपूर्ण समाज एकमेकांच्या सहयोगाने प्रकाशमान करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना मिळालेले श्रवणयंत्र व विविध दिवाळीच्या भेटवस्तूंनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *