विद्यार्थी बनले दुकानदार तर पालकांनी केली दिवाळी साहित्याची खरेदी
किल्ले बनवा उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
नगर (प्रतिनिधी)- श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत चला दुकानदार होऊ या! हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी लागणारे आकाश कंदील, पणत्या, पुजेसाठी लागणारे ताट, तोरण, रंगिबेरंगी विविध सजावटीचे बनविलेल्या वस्तूंचे स्टॉल लावले होते. या स्टॉलवर पालक वर्गांनी दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. मुलांना व्यावहारिक ज्ञान आत्मसात होण्यासाठी हा आगळा-वेगळा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.
तसेच मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती होण्यासाठी किल्ले बनवा उपक्रम राबविले. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रतापगड, तोरणा, रायगड आदी किल्ल्यांचे प्रतिकृती बनविले होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी पालक शिक्षण समितीच्या व्हाईस चेअरपर्सन मृणालताई कनोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भामरे आदींसह सर्व शालेय शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या. या दिवाळी साहित्य खरेदी मेळाव्यात तुझा कितीचा माल विकला?, किती माल शिल्लक राहिला? अशा आनंदी वातावरणात पालकांच्या उपस्थितीमध्ये दिवाळीची खरेदी विक्री रंगली होती. उपस्थित पाहुणे देखील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाने भारावून गेल्या.
या उपक्रमासाठी जगन्नाथ कांबळे, सुशिलकुमार आंधळे, बबनभाई शेख, राजेंद्र गर्जे, चंदा कार्ले, अनिता जपकर, सुकन्या खरात, विदया नरसाळे, रितीका राऊळ यांनी विशेष परिश्रम घेतले.