युवतींनी रॅम्प वॉक करून विविध कलागुणांचे केले सादरीकरण
नगर (प्रतिनिधी)- शहरात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवात ब्युटी टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. तर युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मेकअप सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या ब्युटी टॅलेंट शो मध्ये शहरातील मेकअप आर्टिस्ट, महिला व युवतींनी उत्सफूर्त सहभाग नोंदवला. नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा सप्ताहाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद यांनी अद्यावत मेकअपचे धडे दिले. यावेळी मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके, विद्या सोनवणे, उडान फाउंडेशनच्या संचालिका आरती शिंदे, विद्या सोनवणे आदी उपस्थित होत्या.
या ब्युटी टॅलेंट शोमध्ये मेकअप आर्टिस्ट यांनी आपल्या मॉडेल्सना पारंपारिक वेशभुषेत सजविल्या होत्या. विविध वेशभुषेतील युवतींनी रॅम्प वॉक करून नृत्य, अभिनयासह कलेचे सादरीकरण केले. यामध्ये दोनशेपेक्षा जास्त युवती व महिलांनी सहभाग नोंदवला.
अलका गोविंद यांनी महिलांचे सौंदर्य खुलविण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञान व सौंदर्य प्रसाधनावर उपस्थित महिला व युवतींना मार्गदर्शन करुन मेकअपचे प्रात्यक्षिक दाखविले. आरती शिंदे यांनी स्किन केअरची माहिती दिली. विद्या सोनवणे यांनी फेशियल बाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिक सादर केले. ब्युटी टॅलेंट शोमध्ये प्रथम- नंदनी चौधरी, द्वितीय- प्रिया शिंदे, तृतीय- रितिका बिद्रे यांनी बक्षीसे पटकाविली. या स्पर्धेचे परीक्षण उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री शिंदे, कल्याणी गाडळकर, किरण कोतवाल, ॲड. शारदाताई लगड, रुक्सार शेख, सुवर्णा कैदके, रजनी ताठे यांनी परिश्रम घेतले.