काळीआई ओलीभरण रेनगेन बॅटरी अभियान राबवण्यास प्रारंभ
नगर (प्रतिनिधी)- यंदाच्या संक्रांतीपासून पुढील 4 महिने 1972 ची सुकडी आठवा आणि 52 वर्षाचा दुष्काळ हटवा! अशी घोषणा देत, पीपल्स हेल्पलाइनने राज्यभर काळीआई ओलीभरण रेनगेन बॅटरी अभियान राबवण्यास प्रारंभ केला आहे. शेतात चांगले पीक येण्यासाठी व ओल टिकून राहण्यासाठी रेनगेन बॅटरीचा अवलंब करण्याची जागृती शेतकरी वर्गामध्ये केली जात असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
महाराष्ट्राचे सध्याचे कृषिमंत्री ना. ॲड. माणिकराव कोकाटे यांनी 1972 च्या दुष्काळामध्ये संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र खडी फोडण्यासाठी कामावर जात होता आणि लोकांना नाईलाजाने सुकडी खावी लागत असल्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे पीपल्स हेल्पलाईनने अशा अनुभवी कृषी मंत्र्यांच्या मदतीने सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ गावामध्ये सरपंच चंद्रभान कुटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळीआई ओली भरण कार्यक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या गावांमध्ये दोन ते अडीच फूट पिकाऊ माती आहे. तर त्याखाली सुमारे दहा फुटाचा मुरूम आहे. त्यामुळे या भागात रेन गेन बॅटरी प्रत्येक जमिनीमध्ये बसविणे शक्य होणार आहे. गावचे सरपंच चंद्रभान कुटे यांनी किमान 16 हजार हेक्टर जमिनीवर सर्व शेतकऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यासाठी लोकांना संघटित करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहे. तर गावातील शेतकरी भगीरथ लांडगे, मीना सगर, कविता कुटे, संदीप कुटे, नामदेव कुटे, भाऊसाहेब घोडके, अशोक पवार, रामनाथ बर्डे यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.
या गावच्या प्रत्येक दोन एकरामध्ये 20 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 8 फूट खोल जमिनीच्या उताऱ्याला आडवे खड्डे घेऊन त्यामध्ये दगड गोटे भरण्यात येणार आहेत. त्याच्या वरच्या बाजूला कडक मुरूम टाकण्यात येईल. पहिल्या पावसाळ्यातच उतारा कडे जाणारे पाणी रेन गेन बॅटरीमध्ये मुरविले जाणार आहे. त्यातून जमिनीच्या खालच्या भागातून सर्व शेतात वर्षभर ओल टिकून राहणार आहे. त्यामुळे जिरायती जमिनीचे रूपांतर धनराई अशा फळ बागायतीमध्ये होणार आहे. खरीप आणि रब्बीच्या पिकांना देखील या रेन गेन बॅटरीचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रात 1972 पासून लक्षावधी फळबागा जमिनीतील ओल्या अभावी नष्ट झाल्या आणि लाखो हेक्टर जमिनी शेतकऱ्यांनी कसण्याचे सोडून दिले आहेत. एकंदरीत 1972 नंतर महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यात वाळवंट निर्मिती होऊ लागली आहे. त्याला रेन गेन बॅटरी आणि निसर्ग धनराई याच मार्गाने वाळवंट थोपवता येईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक पटीने वाढवता येऊ शकणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.
काळी आई ओली भरण म्हणजे झाडांच्या मुळाभोवती वर्षभर अक्षय ओल टिकून राहील आणि गरज वाटल्यास ठिबक सिंचनातून कमी पाण्यात फळबागा वाढविता येतील. रेन गेन बॅटरी मुळे पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होण्याअगोदर पाण्याचे संचय होणार आहे. ऊन, वारा, सूर्यप्रकाश यांचा पाण्याशी संबंध येत नाही त्याच वेळेला पावसाचे वाहून नेणारे पाणी तातडीने जमिनीखाली सोडले जाते. एकंदरत पडणाऱ्या पावसाच्या 80 टक्के पाणी जमिनीखाली गेल्यामुळे शेत जमिनीला वर्षभर ओल टिकून राहणार असल्याचे म्हंटले आहे.
पावसाने ओढ दिली तरी रब्बी किंवा खरीपाची पिके वाळून जात नाही. कालपर्यंत महाराष्ट्रासह देशभर जलसंधारणाच्या कार्यक्रमातून जमिनीवर पाणी साठविले जायचे, मात्र यातून बाष्पीभवनातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान व्हायचे. परंतु रेन गेन बॅटरीमुळे यापुढे जिरायती जमिनी देखील उपजाऊ होऊ शकणार आहेत. दोन एकर जमीन असणारा अल्पभूधारक देखील आपली शेती एका कुटुंबासाठी पिकवून पुरेसे आर्थिक उत्पन्न घेऊ शकणार आहे. रेन गेन बॅटरी आणि धनराईमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संघटनेच्या वतीने ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केला आहे.