वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवियत्री, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांच्या अनन्यता काव्यसंग्रहास राज्यस्तरीय सारांश उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातून सारांश पुरस्कारासाठी निवडक साहित्यिकांची निवड करण्यात आली असून, लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मिरज सांगली येथे कवियत्री आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती सारांशचे सल्लागार डॉ. अनिल दबडे यांनी दिली आहे.
सारांशचे प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्मरणिकेतही कवयित्री अल्हाट यांचे कार्य, परिचय व कवितांना विशेष स्थान देण्यात आले आहे. सरोज आल्हाट यांचे यापूर्वी अश्रूंच्या पाऊलखुणा, कविता तुझ्या नि माझ्या, सखे असे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. अनन्यता या चौथ्या काव्य संग्रहास हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सरोज आल्हाट यांना साहित्यिक क्षेत्रातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विविध संस्थांमध्ये प्रकल्प संचालक जनरल सेक्रेटरी अशा उच्च पदांवर राहून दलित, पीडित शोषित, परित्यक्ता, आदिवासी, आरोग्य समस्या, युवकांचे प्रश्न, वीटभट्टी व ऊसतोड कामगार अनाथ, अंध, कुष्ठरोगी, एड्सग्रस्त इत्यादी घटकांसाठी विकासात्मक धोरणात्मक कार्यक्रमांमधून त्या गेली तीस वर्षांपासून कार्यरत आहेत. साहित्यातून प्रबोधनपर व्याख्याने व त्यांचे लिखाण सुरु आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.