नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनेचा इशारा; मूळ गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा पेटला
उपमहापौरांच्या उपस्थितीत महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेहरू मार्केटच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या नव्या व्यापारी संकुलामध्ये मूळ गाळेधारक व ओटेधारकांचे पुनर्वसन ग्राउंड फ्लोअरवरच करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी (दि. 30 जून) अहिल्यानगर महानगरपालिकेत उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात महापालिकेने दिलेल्या प्रतिज्ञापत्राची आठवण करून देत, त्यानुसार पुनर्वसनाची लेखी हमी तातडीने द्यावी, अन्यथा न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला.
या बैठकीला प्रकल्प अधिकारी राजेंद्र मेहेत्रे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी मूळ गाळेधारक व ओटेधारकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ठामपणे मांडत, व्यापारी संकुलातील जागा ग्राउंड फ्लोअरवरच देण्याची मागणी केली.
अहिल्यानगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना ताज्या भाज्या सहज उपलब्ध व्हाव्यात आणि गोरगरीब भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी व्यवसायाचे ठिकाण मिळावे, या उद्देशाने तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय नवनीतभाई बार्शीकर यांच्या कार्यकाळात चितळे रोडवरील मध्यवर्ती ठिकाणी नेहरू मार्केटची उभारणी करण्यात आली होती. अनेक वर्षे शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह या मार्केटवर अवलंबून होता. मात्र, महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर या जागेवर आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सुमारे 15 वर्षांपूर्वी नेहरू मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर मूळ गाळेधारक व ओटेधारकांना पर्यायी व्यवस्था न मिळाल्याने अनेकांना रस्त्यावर व्यवसाय करण्याची वेळ आली.
पुनर्वसनाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांत गाळेधारकांनी व भाजी विक्रेता संघटनेने विविध आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केला. मात्र, प्रश्न मार्गी न लागल्याने संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात अहिल्यानगर महानगरपालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून नेहरू मार्केटमधील 14 गाळेधारक आणि 70 ओटेधारक भाजी विक्रेत्यांचे नव्या व्यापारी संकुलामध्ये पुनर्वसन करण्यात येईल, अशी स्पष्ट हमी दिली होती. बैठकीत संघटनेने याच प्रतिज्ञापत्राची प्रत दाखवत प्रशासनाला त्याची जाणीव करून दिली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिकेने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 70 ओटेधारकांकडून केवळ नाममात्र भाडे आकारण्यात येणार असून, 14 गाळेधारकांकडून फक्त बांधकामाचा नाममात्र खर्च घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. याशिवाय, मागील 15 वर्षांत महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्येही नेहरू मार्केटचा विषय वारंवार चर्चेला आला असून, गाळेधारक व ओटेधारकांचे ग्राउंड फ्लोअरवरच पुनर्वसन करण्यासंदर्भातील ठराव मंजूर झाल्याची बाबही संघटनेने निदर्शनास आणून दिली.
बैठकीत संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, नव्या व्यापारी संकुलाच्या उभारणीस किंवा इतर गाळ्यांच्या विक्रीला संघटनेचा कोणताही विरोध नाही. मात्र, मूळ गाळेधारक व ओटेधारकांना न्यायालयीन आदेशानुसार आणि महापालिकेच्या प्रतिज्ञापत्रानुसार ग्राउंड फ्लोअरवरच जागा देण्यात यावी, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. महापालिकेने याबाबत लवकरात लवकर लेखी निर्णय द्यावा. अन्यथा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.
उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी बैठकीतील संपूर्ण चर्चेचे अधिकृत इतिवृत्त (प्रोसीडिंग) तयार करून संबंधित विषय महापालिकेच्या स्तरावर चर्चेस घेण्यात येईल आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. मात्र, संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी, “ग्राउंड फ्लोअरवरच पुनर्वसन व्हावे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी,” असे स्पष्ट सांगितले. बैठकीला नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनेचे आर. डी. करंदीकर, बी. बी. गौरी, अशोक लांडे, राजेंद्र चौधरी, रामभाऊ केळकर, रत्नाकर कोफ्लडके, बालाजी भुमय्या, पवन खेतमाळीस, रुपेश तरोटे, विजय चौधरी यांच्यासह अनेक गाळेधारक व ओटेधारक उपस्थित होते.
—–
‘हक्काची जागा मिळाली नाही तर न्यायालयीन लढा अपरिहार्य’
“महापालिकेने नेहरू मार्केट पाडताना उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून 14 गाळेधारक व 70 ओटेधारकांचे पुनर्वसन करण्याची स्पष्ट हमी दिली होती. आता त्याच जागेवर व्यापारी संकुल उभारताना मूळ धारकांना प्राधान्याने ग्राउंड फ्लोअरवर जागा देणे बंधनकारक आहे. नव्या इमारतीच्या बांधकामाला किंवा इतर गाळ्यांच्या विक्रीला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या हक्काची जागा ग्राउंड फ्लोअरवरच मिळाली पाहिजे. महापालिकेने प्रतिज्ञापत्रानुसार गाळे न दिल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. -संजय झिंजे (अध्यक्ष, नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटना)

