• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरु

ByMirror

Aug 21, 2025
कास्ट्राईब महासंघाचा ठाम पाठिंबा

कास्ट्राईब महासंघाचा ठाम पाठिंबा


आरोग्यसेवा विस्कळीत; कायम नियुक्तीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

नगर (प्रतिनिधी)- सेवेत कायम समायोजनासह इतर प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. गुरुवारी (दि. 21 ऑगस्ट) महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने या आंदोलनाला ठाम पाठींबा जाहीर केला.


महासंघाचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, राज्य उपाध्यक्ष वसंतराव थोरात, बाळासाहेब शिंदे आणि सोमनाथ शिंगाडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांना समर्थनाचे पत्र दिले.


सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे शासकीय सेवेत कायम समावेश. शासनाने 14 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन नियमित सेवेत करण्याचे आदेश निर्गमित झाले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने असंतोष वाढला असून, कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारला आहे.


या आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. मागण्यांमध्ये कायम समावेशाशिवाय बदली धोरण, वेतनवाढ, आरोग्य व अपघात विमा योजना यांचाही समावेश आहे.


राज्याध्यक्ष पवळे म्हणाले की, शासकीय सेवेत मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. ती पदे भरली न गेल्याने सर्व जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर येते. अनेक वर्षे सेवा देऊनही त्यांना नियमित करण्याबाबत सरकारचे कामगारविरोधी धोरण सुरू आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हाध्यक्ष के.के. जाधव म्हणाले की, संप हा अन्यायाविरुद्धचा आणि हक्काचा लढा आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने राहून हा लढा यशस्वी करणे आवश्‍यक आहे. सरकार वेळकाढूपणा करत असले, तरी आंदोलनाच्या मार्गानेच हा लढा यशस्वी होईल आणि कास्ट्राईब महासंघ नेहमीच या चळवळीच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *