• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

तमाशा कलावंतांवर अमानुष हल्ल्याचा राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या वतीने निषेध

ByMirror

Apr 17, 2026
कलावंतांवर होणारे हल्ले म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारशावरच घाला -पै. नाना डोंगरे

दोषींवर कठोर कारवाईची मागणी; लोककलेवर वाढते हल्ले रोखण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा


कलावंतांवर होणारे हल्ले म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारशावरच घाला -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे आयोजित करण्यात आलेल्या यात्रोत्सवात तमाशा कलावंतांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी केली आहे. तसेच, कारवाई करण्यात विलंब झाल्यास संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या तमाशा आणि लावणीसारख्या लोककलेवर गेल्या काही काळात वारंवार हल्ले होत असल्याचे चित्र दिसत आहे. वडगाव सावताळ येथील बनाईदेवी यात्रोत्सवात कलावंतांना मारहाण करण्यात आली, तसेच महिला कलाकारांशी विटंबनाही करण्यात आली. ही घटना अत्यंत संतापजनक असून, अशा प्रकारच्या घटना आता सातत्याने घडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.


याच पार्श्‍वभूमीवर 1 एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील वरूडी फाटा येथेही एक धक्कादायक प्रकार घडला होता. एका वाहनचालकाने तमाशा फडाच्या गाड्यांना अडवून कलावंतांना बेदम मारहाण केली होती. या घटनेत आठ कलाकार जखमी झाले होते. त्याचप्रमाणे, काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका यात्रेत मद्यधुंद प्रेक्षकांनी स्टेजवर चढून महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती.


नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात देखील कार्यक्रमादरम्यान पैशांच्या उधळणीवरून वाद निर्माण होऊन कलावंतांच्या वाद्यांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनांची मालिका पाहता ग्रामीण भागात तमाशा फडांना सुरक्षित वातावरण मिळणे कठीण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.


या पार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. त्यांनी म्हटले की, “एका बाजूला आपण तमाशा आणि लावणीसारख्या लोककलेला राज्याचा अभिमान मानतो, तर दुसऱ्या बाजूला त्याच कलेचे जतन करणाऱ्या कलावंतांवर अशा प्रकारचे हल्ले होणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे.”


डोंगरे म्हणाले की, “यात्रोत्सवाच्या निमित्ताने कलावंतांना आदराने निमंत्रित केले जाते, मात्र नंतर मद्यधुंद अवस्थेत काही समाजकंटक त्यांच्याशी अभद्र वर्तन करतात, महिला कलाकारांची विटंबना करतात आणि त्यांचे साहित्यही नष्ट करतात. हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारे नाही.” कलावंत केवळ उपजीविकेसाठी नव्हे, तर महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी रात्रभर मेहनत घेत असतात. अशा कलावंतांवर होणारे हल्ले म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारशावरच घाला घालण्यासारखे आहे.”


दरम्यान, तमाशा कलावंतांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्या, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *