• Wed. Jul 9th, 2025

नगरच्या नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंग फू खेळात पटकाविले रौप्य पदक

ByMirror

Oct 30, 2024

आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी

नगर (प्रतिनिधी)- मध्य चीनच्या हेनान प्रांतातील झेंगझोऊ या शहरामध्ये झालेल्या तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात नगरची खेळाडू नयना खेडकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करत कुंग फू मध्ये रौप्य पदक पटकाविले.
झेंगझोऊ हे कुंग फू चे जन्मस्थान असलेले शहर आहे. या शहरात झालेल्या स्पर्धेत 56 देशातील 2,560 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये 4 ते 82 वयोगटात स्पर्धा रंगली होती. नयना खेडकर या मुळच्या नगर शहरातील असून, त्या सध्या चीनमध्ये युनताई माउंटन इंटरनॅशनल कल्चर आणि मार्शल आर्ट्स स्कूलमध्ये थाई व कुंग फू या, सँडाचा सराव करत आहे. त्यांनी या महोत्सवात सहभागी होऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. खेडकर या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून यशस्वी वाटचाल करत आहेत. सध्या गृहिणी असलेल्या लता खेडकर आणि निवृत्त पोलिस अधिकारी कै. निवृत्ती (एन.डी.) खेडकर यांच्या कन्या आहेत.


स्पर्धेच्या प्रारंभी 30 हजार कुंग फू चे खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांनी शाओलिन मंदिर ते उद्घाटन स्थळापर्यंत 13 किलोमीटरच्या मार्गावर शाओलिन कुंग फू चे धाडसी प्रात्यक्षिके सादर केली. 1991 मध्ये तेथील सरकारच्या मान्यतेने शाओलिन वुशू महोत्सव सुरू झालेला असून, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणसाठी दरवर्षी हा महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये कुंग फू साहस आणि कंबोडियन-चिनी बॉक्सिंग शोकेस, कुंग फू प्रात्यक्षिके, सांस्कृतिक पर्यटन प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट या सारख्या विविध सांस्कृतिक उपक्रमाचा समावेश असतो. खेडकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *