विविध स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा आठवा वार्षिक क्रीडा दिवस सोहळा उत्साहात पार पडला. शाळेच्या मैदानावर या सोहळ्याचे उद्घाटन रनर क्लबचे जगदीपसिंग मक्कर, अभिनेत्री शैला टिके कुलकर्णी व पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मंगेश जगताप यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी हातात मशाल घेऊन संचलन केले. शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ करण्यात आले. विविध खेळामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक तसेच विविध सांघिक खेळासाठी पाहुण्यांच्या हस्ते चषक देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट हाउस म्हणून टेरा हाउसला सांघिक चषक देण्यात आला.

जगदीपसिंग मक्कर म्हणाले की, शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालकांनी शैक्षणिक प्रगती बरोबर खेळाचे महत्त्व लक्षात घेऊन खेळात भाग घेण्यासाठी मुलांना प्रेरणा द्यावी. तसेच विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, त्यातून तुम्ही जास्तीत जास्त सक्षम होऊ शकता, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य मंगेश जगताप म्हणाले की, सध्याच्या स्थितीत मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शाळेतील हा क्रीडा दिन आणि क्रीडा स्पर्धा मुलांना निश्चितच मैदानी खेळ खेळण्याकडे आकर्षित करतील. मुलांचा विकास होण्याच्या दृष्टीने मैदानी खेळ महत्त्वाचे आहे. त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होईल. मुलांचा सर्वागीण विकास होण्यासाठी शाळा नेहमीच विविध उपक्रम राबवते. नवनवीन संकल्पना राबवण्यासाठी शाळेत असलेले पोषक वातावरणाची त्यांनी माहिती दिली.

पालकांनी पोदार शाळेद्वारे एकवीसाव्या शतकात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल व खेळाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक करुन शालेय प्रशासनाचे आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांना खेळाडूवृत्तीने स्पर्धेत भाग घेण्यासाठी व नियमांचा आदर करण्याची शपथ देण्यात आली. शाळेचा ध्वज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फडकविण्यात आला. शाळेच्या वेंटस, आक्वा, इग्निस व टेरा गटातील विद्यार्थ्यानी संचालन केले. याप्रसंगी या क्रीडा सप्ताहामध्ये झालेल्या क्रिकेट, खोखो, कबड्डी, हॉलीबॉल, थ्रो बॉल, रस्सीखेच, क्रिकेट अशा विविध सांघिक स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी धावणे, बुक बॅलन्सिंग, लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यानी विविध क्रीडा प्रात्यक्षिके व नृत्याद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत, मार्शलआर्ट, लाठीकाठी नृत्य, साडी नृत्य, लेझीम, पिरॅमिड असे विविध खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच यावेळी पालकांची धावण्याची स्पर्धा रंगली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी सार्थक दौंड, प्रणव चौधरी, जीवीता इंगळे, किनीशा पारख यांनी केले. आभार शाळेची हेड गर्ल रिचा बिहाणी हिने केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य मंगेश जगताप, प्रशासन अधिकारी आशुतोष नामदेव सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेच्या पालक वर्गांनी परिश्रम घेतले.