समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनची जनजागृती मोहीम
नागरिकांनी अवयवदानबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून या चळवळीत सहभागी व्हावे -अण्णा हजारे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजामध्ये अवयवदान, नेत्रदान आणि देहदानाबाबत जागरूकता निर्माण करून त्यासंदर्भातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने अवयवदान जनजागृतीवर आधारित माहितीपूर्ण पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे संपन्न झाले. या उपक्रमामुळे समाजात अवयवदानाविषयी सकारात्मक विचार निर्माण होण्यास आणि अधिकाधिक नागरिक या चळवळीत सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, तुलसीराम पालीवाल, संजय सांवत, माजी सैनिक रामसिंग रायजी, नाना पठारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या भेटीदरम्यान फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या नेत्रदान आणि अवयवदान जनजागृती अभियानाची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत अवयवदानाचा संदेश पोहोचावा यासाठी तयार करण्यात आलेली माहिती पुस्तिकाची माहिती अण्णा हजारे यांना देण्यात आली. फाऊंडेशनच्या वतीने ही पुस्तिका नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातून अवयवदानाबाबतचे वैज्ञानिक सत्य, कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक महत्त्व यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली जाणार आहे. समाजातील गरजू रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारी ही चळवळ भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मानस फाऊंडेशनने व्यक्त केला आहे.
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले की, देशात आणि राज्यात हजारो रुग्ण विविध अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. अनेकांचे जीवन हे योग्य वेळी अवयव उपलब्ध होण्यावर अवलंबून आहे. मात्र, अवयवदानासंदर्भात समाजात अजूनही अनेक गैरसमज, भीती आणि चुकीच्या समजुती प्रचलित असल्याने अपेक्षित प्रमाणात अवयवदान होत नाही. हे गैरसमज दूर करण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशन सातत्याने जनजागृतीचे काम करत आहे. या चळवळीमुळे अनेक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला असून, काहींनी प्रत्यक्ष नेत्रदान करून अंध व्यक्तींना नवदृष्टी देण्याचे महान कार्य केले आहे.
बोरुडे यांनी पुढे सांगितले की, वैद्यकीय विज्ञानाने मोठी प्रगती केली असली तरी मानवी अवयव कृत्रिमरीत्या निर्माण करणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे मरणोत्तर अवयवदान हाच गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. यासाठी नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने या विषयाकडे सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिले, तर अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अवयवदानामुळे अनेक गरजू व्यक्तींना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे हे केवळ दान नसून समाजासाठी केलेले एक महान पुण्यकर्म असल्याचे त्यांनी नमूद केले. “अवयवदानाची चळवळ ही समाजाला दिशा आणि प्रेरणा देणारी आहे. आज अनेकजण स्वतःपुरते विचार करतात; मात्र समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासली पाहिजे. जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी सुरू केलेले हे कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी अनेकांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे कार्य केले आहे,”
अण्णा हजारे यांनी पुढे सांगितले की, ज्यांना प्रत्यक्ष अवयवाची गरज आहे, त्यांनाच त्याचे महत्त्व आणि किंमत अधिक चांगल्या प्रकारे समजते. अनेक रुग्ण महिनोन्महिने, तर काही वेळा वर्षानुवर्षे अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असतात. अशा गरजूंसाठी समाजाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

