जागतिक अनाथ मिशनच्या आशिया खंड प्रमुखांची अहिल्यानगरच्या हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनला भेट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षित, वंचित आणि निराधार घटकांसाठी कार्यरत असलेल्या हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनला जागतिक अनाथ मिशन (वर्ल्ड ऑर्फन्स मिशन) च्या आशिया खंड प्रमुख अनुपमा सिलास (अनु मॅडम) यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची पाहणी करून सुरु असलेल्या सामाजिक कार्य जाणून घेतले.
संस्थेच्या कार्याचा आढावा देतांना फाउंडेशनच्या अध्यक्षा निर्मलाताई केदारी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “फाऊंडेशनमार्फत स्किल डेव्हलपमेंट, झोपडपट्टी भागातील जनजागृती, अन्नदान, शालेय साहित्य व गणवेश वाटप केले जाते. तसेच रेल्वे स्थानके व फ्लायओव्हर परिसरातील गरजूंना भोजन, आणि होप मिशन व होपस्टर उपक्रमांतून निराधारांना मदत व पुनर्वसनाचे कार्य सुरू आहे.”
यावेळी अनुपमा सिलास म्हणाल्या, “सेवा करण्यासाठी पुढे येणाऱ्या व्यक्तींमुळेच अनेकांना जीवनाचा आधार मिळतो. एखाद्या दिवशी आपल्या हातून एखाद्या गरजू व्यक्तीला मदत झाली तर तो दिवस खऱ्या अर्थाने सार्थक ठरतो. एक चांगला माणूस घडला, तर तो दुसऱ्यालाही घडवतो आणि त्यातून समाज परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते.”
युद्ध किंवा इतर संकटांमुळे प्रभावित झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी 2014 पासून युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक अनाथ मिशन चळवळीची माहिती देताना त्या म्हणाल्या, “मुलांना शक्यतो त्यांच्या कुटुंबीयांशी व नातेवाईकांशी पुन्हा जोडणे, पालकांचे समुपदेशन करून त्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण उपलब्ध करून देणे हे आमच्या चळवळीचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
लाईट हाऊस प्रोजेक्टची माहिती देतांना द हार्बर सोसायटी लाईट हाऊस” प्रोजेक्टचे डायरेक्टर प्रमोद मगर यांनी सांगितले की, “आमची सोसायटी समुदाय विकास, पुणे येथे रेड लाईट परिसरातील महिला व बालकांचे पुनर्वसन, कौटुंबिक समुपदेशन, दुर्लक्षित मुलांचे संगोपन, बेघर व निराधार व्यक्तींना मदत, महिलांसाठी शेल्टर होम, मनोरुग्ण व तणावग्रस्त व्यक्तींना आधार देणे अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. अहिल्यानगर येथील हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनचे कार्य सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे शिवाजी जाधव यांनी अनुपमा सिलास यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला पीपल्स हेल्पलाइनचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात, डेव्हिड औचिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नर्सिंग विभागाच्या प्रमुख मंदा मॅडम यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले, तर अनिता वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजसेवेची प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

