• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

विजय भालसिंग यांना मुंबईत ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान’ पुरस्काराने गौरव

ByMirror

Jun 14, 2026
विजय भालसिंग यांना मुंबईत ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान’ पुरस्काराने गौरव

निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल; पशु-पक्षी संवर्धनापासून वारकरी सेवेपर्यंत बहुआयामी योगदान


स्वखर्चातून समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि जनहितासाठी झटणाऱ्या कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, धार्मिक उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्‍नांवर सातत्याने काम करणारे वाळकी (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित दर्पण गौरव संमेलनात हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


मुंबईतील पत्रकार भवन येथे झालेल्या या सोहळ्यात प्रसिद्ध कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयकर विभागाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुनिल अगवणे, संगीतकार कौशल इनामदार, डॉ. अमजद खान पठाण, डॉ. पूर्णिमा सुर्वे, जलसंपदा विभागाचे विशेष अधीक्षक डॉ. जे. के. महाडिक, समाजभूषण पुरस्कार विजेते उत्तम तरकसे, सायली पावसकर, कार्यक्रमाच्या संयोजिका सलमा खान, एन. डी. खान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


विजय भालसिंग हे गेल्या जवळपास वीस वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि पर्यावरण क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. एसटी बँकेतील नोकरी सांभाळत असतानाही त्यांनी समाजसेवेची वाट निवडली असून, कोणतेही शासकीय अनुदान किंवा वर्गणी न घेता स्वतःच्या खर्चातून विविध उपक्रम राबविण्याची त्यांची परंपरा कायम आहे.


ग्रामीण भागातील प्रश्‍न, नागरिकांच्या अडचणी आणि पर्यावरण संवर्धनाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी सातत्याने जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वाढते शहरीकरण आणि कमी होत चाललेली नैसर्गिक अधिवास व्यवस्था यामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची जाणीव ठेवून भालसिंग यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.


उन्हाळ्याच्या दिवसांत तहानलेल्या पशु-पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी पाणवठे निर्माण करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, झाडांवर धान्य आणि पाण्याची भांडी लावणे, तसेच पक्ष्यांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी नारळाच्या सालींपासून कृत्रिम घरटी तयार करून ती विविध परिसरात बसविणे, असे अनेक उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत.


पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन या उद्देशाने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहिमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांनी लावलेल्या अनेक वृक्षांचे संगोपन करून हरित क्षेत्र वाढविण्याचे कार्य केले आहे.
सामाजिक आणि पर्यावरणीय कार्याबरोबरच धार्मिक क्षेत्रातही भालसिंग यांचे योगदान उल्लेखनीय आहे. दरवर्षी आषाढी वारीच्या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीसाठी सेवा उपक्रम राबवून ते वारकरी संप्रदायाशी असलेली आपली सामाजिक बांधिलकी जपतात. वारीदरम्यान भाविकांना आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देणे, सेवा कार्यात सहभाग घेणे आणि वारकऱ्यांना मदतीचा हात देणे, ही त्यांची अनेक वर्षांची परंपरा आहे.


वाळकी आणि परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर आवाज उठविणे हेही त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पाणी, रस्ते, मूलभूत सुविधा, सार्वजनिक प्रश्‍न आणि स्थानिक विकासकामांसंदर्भात ते सातत्याने संबंधित शासकीय विभागांकडे पाठपुरावा करीत असतात. स्थानिक नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी अनेकदा पुढाकार घेतला आहे. समाजहित, पर्यावरण संवर्धन, धार्मिक सेवा आणि जनजागृती या विविध क्षेत्रांतील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेने त्यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार’ प्रदान केला.


पुरस्कार स्वीकारताना भालसिंग यांनी हा सन्मान समाजकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि जनतेच्या विश्‍वासाचा असल्याची भावना व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातही अशाच निस्वार्थ भावनेने समाजसेवा सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *