• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

श्रमिकनगरला लाल झेंडा फडकवून कामगार दिन साजरा

ByMirror

May 2, 2026
श्रमिकनगरला लाल झेंडा फडकवून कामगार दिन साजरा

आजही कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघटितपणे संघर्ष करावा लागणार -अशोक सब्बन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगरला विडी कामगारांच्या उपस्थितीमध्ये कामगार दिवस साजरा करण्यात आला. श्रमिक हाऊसिंग सोसायटी, लालबावटा विडी कामगार युनियन व आयटक संघटनेच्या वतीने कामगार चळवळीचा प्रतिक असलेला लाल झेंडा फडकविण्यात आला.


मार्कंडेय विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक सब्बन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्रमिक जनता नगर सोसायटीचे चेअरमन विलास सग्गम, सेक्रेटरी शंकर येमूल, सहसेक्रेटरी दत्तात्रय भीमनाथ व सर्व पदाधिकारी तसेच माजी अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, राजू म्याना, भीमराज कोडम, बालाजी मंदिराचे अध्यक्ष विनोद म्याना, तसेच मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे, मुख्याध्यापिका विद्या दगडे, विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, कॉ. सगुणा श्रीमल, कॉ. संगीता कोंडा, कॉ. भाग्यलक्ष्मी गड्डम, कॉ. पूजा न्यालपेल्ली आदींसह शिक्षक व शिक्षतेतर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच श्रमिकनगर मधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अशोक सब्बन यांनी कामगार दिनाची माहिती देऊन, कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली आपण किती लढे करून हक्क मिळवले याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, मोठ्या संघर्षानंतर कामगारांनी आपला हक्क मिळवला आहे. महिला-पुरुष कामगारांमधील भेदभाव नाहिसा झाला. पूर्वी भांडवलदार वर्ग कामगारांना गुलामासारखे राबवत होते. मात्र कामगार कायद्यासाठी मोठा उठाव करावा लागला. आजही कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघटितपणे संघर्ष करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. भारती न्यालपेल्ली म्हणाल्या की, कामगार दिवस हा सर्व कामगार आपल्या हक्कासाठी एकजुट होण्याचा संदेश देत आहे.

कामगार दिनाचा हा प्रदीर्घ इतिहास लक्षात घेताना घटत चाललेला रोजगार आणि वाढत चाललेली महागाई याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. आज अर्थव्यवस्था केवळ भांडवलदार केंद्रीत बनली आहे. यासाठी पुन्हा संघटितपणे संघर्ष करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *