“शिवाजी कोण होता?” पुस्तकाला ‘राष्ट्रीय जनलोक क्रांती ग्रंथ’ घोषित
खांबाळी पाझर तलावातील पाणी-वीज चोरीविरोधात ‘रेड गॅझेट’प्रसिध्द
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाला महाराष्ट्र दिनानिमित्त ‘राष्ट्रीय जनलोक क्रांती ग्रंथ’ म्हणून घोषित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक येथे भोंदूशाही व मानसिक गुलामगिरीविरोधात “जनलोक बुटांजली सत्याग्रह” करण्यात आला.
चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात झाली. या वेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विजय शिरसाठ, दिलीप साळवे, बाळासाहेब पालवे, निवृत्ती मैड, शंकर साळवे, अशोक भोसले, यशवंत लवटे, पोपट भोसले, रविंद्र केदार, अशोक केदार, संदीप साळवे, निलेश साळवे, विलास साळवे आदी उपस्थित होते.
समाजात धर्माच्या नावाखाली जातीय द्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्तीविरोधात नागरिकांनी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला. सर्वांनी एकत्रितपणे बूट उंचावून “बुटांजली” अर्पण करत मानसिक गुलामगिरीविरोधात आवाज उठविला. या आंदोलनाचा उद्देश समाजातील अंधश्रद्धा, भीती व खोटी माहिती यामुळे निर्माण झालेल्या मानसिक गुलामगिरीला विरोध करणे हा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या वेळी “नॉन जेनेटिक इनफॉरमेशन” या संकल्पनेवर सखोल भाष्य करण्यात आले. समाजात पिढ्यानपिढ्या जात, धर्म व परंपरांच्या माध्यमातून मेंदूत भरवली जाणारी माहिती माणसाच्या विचारस्वातंत्र्यावर परिणाम करते, असे सांगण्यात आले. भीती, ओळख आणि स्वार्थ यांच्या आधारे लोकांच्या भावनांवर नियंत्रण ठेवले जाते, ज्यामुळे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता कमी होते, असा आरोप करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा आदर्श “शून्य-जात मावळा स्वराज्य” या संकल्पनेतून मांडण्यात आला. जातविहीन, लोकाभिमुख आणि न्यायावर आधारित प्रशासन हेच खरे स्वराज्य असल्याचे सांगण्यात आले. हे स्वराज्य केवळ राजकीय नसून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी उभे राहिलेले होते, असे मत व्यक्त करण्यात आले.
पारनेर तालुक्यातील पळशी येथील खांबाळी पाझर तलावात सुरू असलेल्या कथित पाणी व वीज चोरीविरोधात “रेड गॅझेट” प्रकाशित करण्यात आले. हा तलाव परिसराच्या जलव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, झिरपण प्रक्रियेद्वारे भूजल पातळी टिकवून ठेवतो. मात्र, बेकायदेशीर पाणी उपसा व वीज चोरीमुळे जलचक्र धोक्यात आले आहे. यामुळे विहिरींची पातळी घटत असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी मिळत नाही. संघटनेने या प्रकाराला “सार्वजनिक जलसंपत्तीची लूट” असे संबोधले आहे.
अशोक सब्बन म्हणाले की, आपण ज्या ‘शिवाजी कोण होता?’ या ग्रंथाला ‘राष्ट्रीय जनलोक क्रांती ग्रंथ’ म्हणून घोषित करतो आहोत, तो केवळ इतिहास सांगणारा नाही, तर समाजाला विचार करण्यास भाग पाडणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य हे कोणत्याही एका जातीसाठी नव्हते, तर सर्वांसाठी होते. आज समाजात जे अंधश्रद्धा आणि भोंदूशाहीचे जाळे निर्माण झाले आहे, त्याला छेद देण्यासाठी हा बौद्धिक लढा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, ‘नॉन जेनेटिक इनफॉरमेशन’ ही संकल्पना समजून घेणे आज अत्यंत गरजेचे आहे. कारण समाजातील अनेक गोष्टी आपण परंपरेच्या नावाखाली स्वीकारतो, पण त्यामागे विचार करत नाही. भीती, धर्म आणि जात यांच्या आधारे लोकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. हा सत्याग्रह त्या मानसिक गुलामगिरीविरोधातील क्रांती आहे. खांबाळी पाझर तलावातील पाणी व वीज चोरी ही केवळ कायद्याचा भंग नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कांवर आघात आहे. सार्वजनिक जलसंपत्तीची लूट थांबविण्यासाठी आम्ही ‘रेड गॅझेट’ प्रकाशित केले आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ही बेकायदेशीर कामे थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रकाश थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सर्व जाती-धर्मातील लोकांना समान संधी देत समतेचा मजबूत पाया घालण्यात आला. त्यांनी पाटील, वतनदार आणि जहागीरदार यांच्या माध्यमातून चालणाऱ्या फारशी भाषेतील कारभारामुळे सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय ओळखून प्रथमच राज्यकारभार मराठी भाषेत सुरू केला, ज्यामुळे सामान्य प्रजेला प्रशासन समजले, न्याय सुलभ झाला आणि लोकांचा शासनातील सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. महाराजांच्या समावेशक धोरणामुळे मुस्लिम समाजातील हुतात्मा मदारी मेहतर अंगरक्षक, दौलत खान यांसारखे आरमार प्रमुख आणि इतर अनेक मानकरी मोठ्या संख्येने स्वराज्यात कार्यरत होते, असे त्यांनी सांगितले.
