• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

श्री मार्कंडेय विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

ByMirror

Jul 11, 2025
गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप


गुरुंच्या मार्गदर्शनानेच यशाचा प्रकाश मिळतो -बाळकृष्ण सिद्दम

नगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमामध्ये गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षिका भारती सानम, संस्थेचे विश्‍वस्त राजेंद्र म्याना, मुख्याध्यापक संदीप छिंदम, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी सुहास बोडखे उपस्थित होते.


बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, गुरु म्हणजे केवळ अध्यापक नसून जीवनाला दिशा देऊन यशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक असतो. गुरुंच्या मार्गदर्शनानेच यशाचा प्रकाश मिळतो. आजच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.


भारती सानम म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरुंच्या माध्यमातून अनेक व्यक्ती यशोशिखरावर पोहचली असल्याचा इतिहास आहे. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या गुरुंचा आदर राखून त्यांच्या मार्गदर्शनाने जीवनाची वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.


शिक्षक प्रतिनिधी अर्चना साळुंके यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यकुशलतेतून यश संपादन करणे, हीच गुरुंसाठी खरी गुरुदक्षिणा असते, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. ज्येष्ठ शिक्षिका रेणुका खरदास यांनी प्रास्ताविकात विद्यालयातील गुणवत्ता आणि संस्कारक्षम उपक्रमांची माहिती दिली.


बाळकृष्ण सिद्दम यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्यासाठी 20 हजार रुपयांची मदत दिली. तर समाजातील दानशूर व्यक्तींनी देखील या उपक्रमास आर्थिक हातभार लावला. कविता गुडेवार यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त उत्कृष्ट असे फलक लेखन करुन चित्र रेखाटले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *