• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

रविवार पासून शहरात रंगणार गॉडविन कप 2025 फुटबॉल स्पर्धा

ByMirror

Nov 22, 2025

जिल्ह्यातील 12 संघाचा सहभाग; स्पर्धेचे दुसरे वर्ष

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या गॉडविन कप 2025 या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेला रविवार (दि.23 नोव्हेंबर) पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा फुटबॉल मधील खेळाडूंना चालना व प्रोत्साहन देण्याचे काम करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


रविवारी संध्याकाळी भुईकोट किल्ला येथील मैदानावर फुटबॉल सामन्यांचे थरार रंगणार आहे. मैदानावर आवश्‍यक तांत्रिक सुविधा, सुरक्षा यंत्रणा, पाणीपुरवठा, खेळाडूंसाठी बदलण्याची खोली, वैद्यकीय सुविधा आणि प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था यांसह सर्व तयारी करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या वर्षीच्या द्वितीय आवृत्तीत जिल्ह्यातील एकूण 12 संघ सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील अनेक उद्योन्मुख खेळाडूंना ही स्पर्धा आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


रविवारी पहिला सामना दुपारी 2:30 वाजता राठोड एफसी विरुध्द डॉन बॉस्को एफसी यांच्यात होणार आहे. दुसरा सामना पहिल्या सामन्यानंतर तत्काळ बाटा एफसी विरुध्द फिरोदिया शिवाजीयन्स एफसी (ब) (यजमान संघ) यांच्यात होणार आहे. दोन रोमांचक सामन्यांनी गॉडविन कपची सुरुवात होत असून, फुटबॉल प्रेमींना या स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ही स्पर्धा फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी यांच्या वतीने, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली आणि डिक परिवाराच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. संयोजन समितीने स्पर्धेचे नियोजन, वेळापत्रक, रेफरी पॅनेल, मैदानाची मांडणी, नियमावली आणि सर्व प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे पार पाडल्या आहेत.


गॉडविन कप ही स्पर्धा फुटबॉलचा उत्सव असून, दिवंगत गॉडविन डिक यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण आहे. त्यांनी फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी व खेळाडू घडविण्यासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून, फुटबॉलसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. ही स्पर्धा म्हणजे त्यांच्या कार्याला दिलेली आदरांजली असल्याची भावना जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव रोनप फर्नांडिस, उपाध्यक्ष खालिद सय्यद, संयुक्त सचिव प्रदीप जाधव आणि सदस्य विक्टर जोसेफ यांनी व्यक्त केले. नगरच्या फुटबॉल क्षेत्रात गॉडविन डिक यांनी घातलेल्या मजबूत पायावर आधारित हा स्पर्धेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या स्पर्धेद्वारे केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *