• Tue. Aug 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘दिल से सरहद तक’! अहिल्यानगरच्या बहिणींच्या प्रेमाचा धागा थेट सरहद्दीवर

ByMirror

Aug 25, 2026
‘दिल से सरहद तक’! अहिल्यानगरच्या बहिणींच्या प्रेमाचा धागा थेट सरहद्दीवर

वीर जवानांसाठी राखी पाठविण्याचा अनोखा उपक्रम; ‘एक राखीएका जवानासाठी’ सहभागी होण्याचे आवाहन


अहिल्यानगर लायन्स क्लब, लिओ क्लब, घर घर लंगर सेवा आणि भारतीय डाक विभागाचा संयुक्त उपक्रम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये भावनिक आणि देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. अहिल्यानगर लायन्स क्लब, लिओ क्लब आणि घर घर लंगर सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने ‘दिल से सरहद तक’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.


या उपक्रमांतर्गत अहिल्यानगरमधील बहिणींनी प्रेमाने दिलेल्या राख्या भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर राहून, प्रतिकूल हवामान आणि अत्यंत कठीण परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींच्या प्रेमाची जाणीव व्हावी, या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


सामान्यतः रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करते. मात्र देशाच्या सीमांचे रक्षण करणारे हजारो जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहून मातृभूमीच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असतात. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवत त्यांनाही ‘आपण एकटे नाही’ असा प्रेमाचा आणि आपुलकीचा संदेश मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


अहिल्यानगरमधील सर्व महिला भगिनी, लायन्स क्लब व लिओ क्लबच्या महिला सदस्य, महिला मंडळे तसेच नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रत्येक महिलेने स्वतः एक राखी देतानाच आपल्या मैत्रिणी, नातेवाईक, परिचित महिला आणि महिला मंडळांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजीतसिंग वाधवा, लिओ क्लबचे अध्यक्ष हर्ष किथानी, हरीश हरवानी, रीत जाजू, विजय कुलकर्णी, किरण भंडारी आणि गुरनूरसिंग वाधवा यांनी केले आहे.


‘एक राखी एका जवानासाठी, एक धागादेशाच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या वीराला समर्पित!’ या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने राख्या जमा कराव्यात, असे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमासाठी राख्या जमा करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2026 आहे. नागरिकांनी आपल्या राख्या घर घर लंगर सेवा, तारकपूर व जय जलाराम बेकरीजवळ, आनंद धाम, येथे जमा कराव्यात. अधिक माहितीसाठी 9423162727 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.


या उपक्रमासाठी धनंजय भंडारे, अरविंद परगावकर, अनघा परगावकर, सतीश बजाज, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, किशोर रंगलानी, दिलीप कुलकर्णी, राजू गुरनानी, कमलेश भंडारी, संदीप कातरिया, सुमित लोढा आणि डॉ. संजय असनानी प्रयत्नशील आहेत. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहीणीच्या नात्याचा सण नसून प्रेम, विश्‍वास, संरक्षण आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. या भावनेला देशसेवेची जोड देत अहिल्यानगरच्या बहिणींनी आपल्या हाताने निवडलेली राखी देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम निश्‍चितच देशभक्तीची भावना अधिक दृढ करणारा ठरणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *