• Tue. Aug 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

गणेशोत्सवापूर्वी प्लास्टिकच्या फुलांच्या विक्री-वापरावर निर्बंध घाला

ByMirror

Aug 25, 2026
‘प्लास्टिकची फुले टाळा; शेतकरी वाचवा, पर्यावरण वाचवा!’

महानगरपालिका आयुक्तांकडे कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे निवेदन


‘प्लास्टिकची फुले टाळा; शेतकरी वाचवा, पर्यावरण वाचवा!’


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर शहरात प्लास्टिक व कृत्रिम फुलांची विक्री, वापर आणि वितरण यावर लागू कायदे व शासनाच्या निर्देशांनुसार आवश्‍यक ती बंदी अथवा निर्बंधात्मक कार्यवाही करावी. तसेच नैसर्गिक फुलांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना व जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास भाऊसाहेब उडानशिवे यांनी अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच आवश्‍यक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.


गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा उत्सव असला तरी तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे हीदेखील सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात सजावट, धार्मिक साहित्य आणि फुलांचा वापर केला जातो. आकर्षक, टिकाऊ आणि तुलनेने स्वस्त असल्यामुळे प्लास्टिक व कृत्रिम फुलांचा वापर वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


प्लास्टिकची फुले वापरल्यानंतर निर्माण होणारा कचरा सहज विघटनशील नसल्यामुळे तो दीर्घकाळ पर्यावरणात राहू शकतो. हा कचरा इतर कचऱ्यामध्ये मिसळल्यास त्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे कठीण होते. तसेच असा कचरा जाळल्यास पर्यावरणास घातक धूर व प्रदूषण निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याच्या वापरावर नियंत्रण आवश्‍यक असल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.


प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापराचा परिणाम नैसर्गिक फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक फुलांचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना जमीन, पाणी, बियाणे अथवा रोपे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक यावर खर्च करावा लागतो. मात्र बाजारपेठेत स्वस्त कृत्रिम फुले मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास नैसर्गिक फुलांची मागणी कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.


त्यामुळे प्लास्टिकच्या फुलांवरील निर्बंध हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून नैसर्गिक फुलांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचाही विषय आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या प्लास्टिकच्या फुलांना आकर्षक रंग व स्वरूप देण्यासाठी कोणते रासायनिक घटक वापरले जातात, याचीही तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाजारातील प्लास्टिकच्या फुलांचे नमुने अधिकृत व मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पाठवून त्यामध्ये शिसे, कॅडमियम, फ्थॅलेट्‌स किंवा अन्य संभाव्य घातक रासायनिक घटक आहेत का, याची वैज्ञानिक तपासणी करण्यात यावी. तपासणीच्या निष्कर्षांच्या आधारे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यक ती कार्यवाही करावी, असे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.


शासनाच्या स्तरावर अविघटनशील प्लास्टिकच्या फुलांच्या प्रश्‍नाची दखल घेण्यात आल्याचा संदर्भ देत, स्थानिक प्रशासनाने लागू कायदे, नियम आणि शासन निर्देशांचा अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करावी, महानगरपालिका प्रशासनाने या विषयाकडे केवळ गणेशोत्सवातील सजावटीचा प्रश्‍न म्हणून न पाहता पर्यावरण संरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, शेतकरी हित आणि शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी या व्यापक दृष्टिकोनातून पाहावे, असे निवेदनात म्हंटले आहे.
गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्यापूर्वीच व्यापारी, गणेश मंडळे, धार्मिक संस्था आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे अधिक परिणामकारक ठरेल. त्यामुळे प्लास्टिकच्या फुलांची विक्री व वितरण करणारी दुकाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक ठिकाणांची विशेष तपासणी करून लागू नियमांनुसार आवश्‍यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
व्यापाऱ्यांना लागू नियमांची माहिती देऊन त्यांचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच गणेश मंडळांना प्लास्टिकच्या फुलांचा वापर टाळून नैसर्गिक फुले, कागदी फुले, कापडी फुले आणि अन्य पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.


महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘प्लास्टिकची फुले टाळाशेतकरी वाचवा, पर्यावरण वाचवा’ ही विशेष जनजागृती मोहीम राबवावी. अधिकृत समाजमाध्यमे, संकेतस्थळ, फलक, पोस्टर, पत्रके आणि जनजागृती वाहनांच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात यावा, याशिवाय व्यापारी संघटना, गणेश मंडळे, शेतकरी प्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या सहभागातून ‘प्लास्टिकमुक्त व शेतकरी हिताचा गणेशोत्सव’ अभियान राबवावे. स्थानिक फूल उत्पादक शेतकरी आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय निर्माण करून नैसर्गिक फुलांना अधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशीही मागणी आहे.


गणेशोत्सव हा पर्यावरण संवर्धनाचाही उत्सव व्हावा. प्लास्टिकच्या फुलांचा वापर टाळून नैसर्गिक फुले आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंचा वापर केल्यास पर्यावरणाचे संरक्षण होण्यासोबतच स्थानिक फूल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळण्यास मदत होईल, असे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे. गणेशोत्सवापूर्वीच या प्रश्‍नाची गांभीर्याने दखल घेऊन महानगरपालिका प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्‍यक सूचना द्याव्यात आणि लागू नियमांनुसार प्लास्टिकच्या फुलांच्या विक्री, वापर व वितरणाबाबत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी विकास भाऊसाहेब उडानशिवे यांनी केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *