शिक्षणाधिकारी यांनी स्वत:ची ठेव ठेऊन केला अभियानाचा प्रारंभ; सभासदांनी ठेवी ठेवून संस्थेच्या भरभराटीस हातभार लावण्याचे आवाहन
ही शिक्षक सेवकांची संस्था असल्याने विश्वसनीय -शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी स्वभांडवली करण्याचा संकल्प घेऊन तसेच कर्जाचे व्याजदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ऐच्छिक ठेव वाढ अभियानाचा शुभारंभ शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन तथा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे आणि व्हाईस चेअरमन तथा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांच्या संकल्पनेतून या अभियानाला प्रारंभ झाला. यावेळी शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांच्यासह चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांनी स्वतः ठेवी ठेवून अभियानाचा शुभारंभ केला.
या प्रसंगी सहकार आयुक्त कार्यालयाचे सेवानिवृत्त अधिकारी सतीश ढमाल, माजी चेअरमन आप्पासाहेब शिंदे, माजी व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके, संचालक महेंद्र हिंगे, सुनील दानवे, सुरज घाटविसावे, वैशाली दारकुंडे, वर्षा खिलारी, विजय पठारे, अतुल कोताडे, बाजीराव अनभुले, शिवाजी लवांडे, छबू फुंदे, साहेबराव रक्टे, किशोर धुमाळ, संभाजी गाडे, बाळाजी गायकवाड, सुधीर कानवडे, राजेंद्र कोतकर, उमेश गुंजाळ, शिक्षक सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे यांच्यासह अमोद नलगे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात चेअरमन बाबासाहेब बोडखे म्हणाले की, आमची सत्ता आली तेंव्हा जिल्हा सहकारी बँकेची मागच्या मंडळाच्या कारकिर्दितील सुमारे 158 कोटी रुपयांची कॅश क्रेडिटची उचल होती. त्याला 12.5 टक्के व्याजदर व कर्जाचा 7 टक्के व्याजदर होता. मात्र नियमबाह्य कामकाज थांबवून आणि काटकसर करून मागील दीड वर्षात कॅशक्रेडीटची 72 कोटी रुपयांवर आणल्याचा दावा त्यांनी केला. संस्था स्वभांडवली करण्याच्या उद्देशाने पावले उचलली जात आहेत. शैक्षणिक चळवळीतले पदाधिकारी संचालक म्हणून काम करत असताना सभासदांचे व संस्थेचे हित समोर ठेवून दूरदर्शीपणे कारभार करत आहेत. सध्याचे कर्जाचे व्याजदर न वाढविता ऐच्छिक ठेव वाढ अभियानाच्या माध्यमातून व्याजदर देखील कमी करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे बोडखे यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेकडून 12.5 टक्क्यांनी घेतलेले सीसी कमी झाल्यास कर्जाचे व्याजदरदेखील कमी करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठीच ऐच्छिक ठेवीचा व्याजदर आम्ही 7.50 टक्के केलेला आहे . त्यामुळे सर्वांच्या ऐच्छिक ठेवी नक्कीच वाढतील हीच अपेक्षा आहे .
माजी चेअरमन आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, संस्थेला 25 वर्षांनंतर ऊर्जित अवस्थेत आणण्याचे काम परिवर्तन मंडळाचे सर्व संचालक योगदान देत आहेत. मुलींचे होस्टेल तयार करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे जागेसाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिकेचे काम सुरू असून, यामध्ये सभासदांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सहकार आयुक्त कार्यालयाचे सेवानिवृत्त अधिकारी सतीश ढमाल म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटी ही शिक्षक सेवकांची संस्था असून ती स्वभांडवलावर चालली पाहिजे. यासाठी ठेवी वाढविणे गरजेचे आहे. शिक्षक सेवकांची बँक असल्याने ती सुरक्षित असून, सीसी कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले पाहिजेत. संस्था स्वभांडवली झाल्यास त्याचा लाभ सर्व सभासदांना मिळणार आहे. पाच लाख रुपयांच्या ठेवीवर असणाऱ्या इन्शुरन्सची माहिती सभासदांना देण्याची सूचना त्यांनी केली. तसेच मागील कार्यकाळात थांबलेली कर्जवसुली करून थकबाकी कमी करण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड म्हणाल्या की, संस्था स्वभांडवली झाल्यास सीसीचा प्रश्न राहत नाही. त्यामुळे कर्जाचे व्याजदर नियंत्रणात ठेवता येतात. संचालक मंडळाने भविष्यातील विचार करून सुरू केलेल्या ऐच्छिक ठेव वाढ अभियानाचे त्यांनी कौतुक केले. ही संस्था शिक्षकांची असून ती विश्वसनीय संस्था असल्याने यामध्ये घोटाळे होऊ शकणार नसल्याचा दावा त्यांनी केला. सर्व सभासदांनी ठेवी ठेवून संस्थेच्या भरभराटीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही संध्याताई गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कानवडे यांनी केले, तर आभार महेंद्र हिंगे यांनी मानले.

