शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनिल सकट दांम्पत्यांचा सामाजिक उपक्रम
दिव्यांगांसाठी सहकार्य करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी -सुनिल सकट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेत महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनिल सकट व सौ. वंदना सुनिल सकट यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्न-धान्याची भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमावेळी संस्थेचे प्रतिनिधी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले, समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. यावेळी बोलताना सुनिल सकट म्हणाले की,“समाजात अनेक घटक असे आहेत जे मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करत आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना सहकार्य करणे ही केवळ मदत नसून आपली सामाजिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळतो आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. भविष्यातही अशा सामाजिक कार्यात सातत्य ठेवणार असून अधिकाधिक लोकांनी या कार्यात सहभागी व्हावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सौ. वंदना सकट म्हणाल्या की, “दिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदतीची नाही, तर प्रेम, आपुलकी आणि मानसिक आधाराचीही गरज असते. त्यांच्यात अपार क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास तेही समाजात मोठे यश संपादन करू शकतात. अशा उपक्रमांतून आपण त्यांना थोडासा आधार देऊ शकतो, हीच आमची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनिल सकट पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, सार्वजनिक स्वच्छता अभियान यांसारख्या उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असतात. तसेच वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, साहित्य वितरण, मार्गदर्शन यासाठी ते पुढाकार घेतात. महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजप्रबोधनाचे कार्यही ते करत आहेत. दिव्यांगांसाठीही त्यांचे योगदान सुरु असल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
