सेंट मायकल, आर्मी आणि तक्षिला स्कूलची विजयी घोडदौड; विविध गटांतील एकतर्फी विजयांनी मैदान दणाणले
शौर्य चंगेडिया, दिवेश अळकुटे, प्रांजल, प्रतिक शेळके आणि अभिनव मोरे यांची गोलांची आतषबाजी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत पावसामुळे निर्माण झालेल्या खंडानंतर सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) पुन्हा एकदा फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळाला. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर विविध वयोगटांतील अत्यंत चुरशीचे आणि रंगतदार सामने रंगले होते. अनेक सामन्यांमध्ये एकतर्फी विजयांची नोंद झाली, तर युवा खेळाडूंनी केलेल्या गोलांच्या आतषबाजीने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. या सामन्यांमध्ये सेंट मायकल स्कूल, आर्मी स्कूल, तक्षिला स्कूल आणि ऑर्चिड स्कूलने प्रभावी कामगिरी करत विजयाची नोंद केली.
सकाळच्या सत्रात 12 वर्षांखालील मुलांच्या गटात जे.एस.एस. गुरुकुल आणि सेंट मायकल स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात सेंट मायकल स्कूलने तब्बल 12-0 अशा दणदणीत फरकाने विजय मिळवला. सेंट मायकलचा शौर्य चंगेडिया हा सामन्याचा हिरो ठरला. त्याने 3, 10, 15, 31 आणि 42 व्या मिनिटाला गोल करत तब्बल पाच गोल झळकावले. अनिश झांजे 14 व 27 व्या मिनीटीला असे दोन, इशान पठारे याने 7 व 8 व्या मिनीटाला दोन, तर रिद्धेश टकले, मोहम्मद अली आणि नमीत फिरोदिया यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाचा विजय अधिक भक्कम केला. जे.एस.एस. गुरुकुलला मात्र एकही गोल करता आला नाही.
16 वर्षांखालील मुलांच्या गटात ज्ञानसंपदा स्कूलविरुद्ध सेंट मायकल स्कूलने 5-0 असा विजय मिळवला. या सामन्यात दिवेश अळकुटे याने एकहाती पाच गोल करत शानदार हॅट्ट्रिकसह लक्षवेधी कामगिरी केली. त्याने 27, 34, 35, 45 आणि 52 व्या मिनिटाला गोल करत प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही संधी दिली नाही.
16 वर्षांखालील मुलींच्या गटात आर्मी स्कूल आणि ऊर्जा गुरुकुल यांच्यातील सामना देखील एकतर्फी ठरला. आर्मी स्कूलने 5-0 अशा फरकाने विजय मिळवला. प्रांजल हिने 5, 15, 17 आणि 39 व्या मिनिटाला गोल करत चार गोलांची नोंद केली, तर शरवरी हिने एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
दुपारच्या सत्रात 16 वर्षांखालील मुलांच्या गटात कौसर स्कूलविरुद्ध आर्मी (ए.सी.सी. अँड एस.) स्कूलने 10-0 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात प्रतिक शेळके याने 7, 16, 17, 28 व 35 व्या मिनीटाला तब्बल पाच गोल करत आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर वीरेंद्र वीर याने दोन, आदर्श साबळे याने दोन आणि वेदांत कारखिळे याने एक गोल करत संघाच्या विजयात भर घातली.
12 वर्षांखालील मुलांच्या गटात जे.एस.एस. गुरुकुलविरुद्ध तक्षिला स्कूलने 7-0 असा एकतर्फी विजय मिळवला. तक्षिलाचा अभिनव मोरे याने पहिल्या मिनीटापासून गोलला प्रारंभ करुन 10, 12, 14 व 25 व्या मिनीटाला पाच गोल करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. जशन चौधरी याने 17 व 33 व्या मिनीटाला दोन गोल करत विजय अधिक भक्कम केला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात तक्षिला स्कूलने ऑर्चिड स्कूलचा 2-0 असा पराभव केला. आरुष माळी याने 41 व्या मिनीटाला आणि शौर्य मोरे याने 31 व्या मिनीटाला प्रत्येकी एक गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
दिवसातील अखेरच्या 16 वर्षांखालील मुलांच्या गटातील सामन्यात ऑर्चिड स्कूलने तक्षिला स्कूलवर 2-0 अशी मात केली. आरव भिसे आणि पृथ्वीराज पालवे यांनी अनुक्रमे 22 व 24 व्या मिनिटाला गोल करत ऑर्चिड स्कूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

