• Thu. Jul 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल स्पर्धेत आयकॉन पब्लिक स्कूल व आठरे पाटील स्कूलची विजयी घोडदौड

ByMirror

Jul 29, 2026
गोलांचा वर्षाव, थरार आणि उत्कंठा

सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट व ऊर्जा गुरुकुलचाही दमदार खेळ; चुरशीच्या सामन्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली


गोलांचा वर्षाव, थरार आणि उत्कंठा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि. 29 जुलै) विविध वयोगटांतील अत्यंत चुरशीचे सामने रंगले. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यांमध्ये युवा खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याची चुणूक दाखवली. दिवसातील सामन्यांमध्ये आयकॉन पब्लिक स्कूल आणि आठरे पाटील स्कूल या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. त्याचबरोबर सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट आणि ऊर्जा गुरुकुलच्या संघांनीही दमदार कामगिरी करत विजयाची नोंद केली.


दिवसभर रंगलेल्या सामन्यांमध्ये गोलसाठी झालेली चुरस, बचावफळीची भक्कम कामगिरी आणि शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिलेली उत्कंठा यामुळे मैदानावर उपस्थित क्रीडाप्रेमींना दर्जेदार फुटबॉलचा आनंद अनुभवायला मिळाला.
सकाळच्या सत्रात 14 वर्षांखालील गटात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि ऊर्जा गुरुकुल यांच्यात झालेला सामना अत्यंत रंगतदार ठरला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र सामन्याच्या 47व्या मिनिटाला सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटच्या स्तवन वडागळे याने केलेला निर्णायक गोल अखेर विजयाचा पाया ठरला. ऊर्जा गुरुकुलला एकही गोल करू न देता सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटने 1-0 असा निसटता विजय मिळवला.


16 वर्षांखालील मुलींच्या गटात ऊर्जा गुरुकुल आणि आयकॉन पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. सामन्याच्या 16व्या मिनिटाला ऊर्जा गुरुकुलच्या शौर्या बेरड हिने शानदार गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बचावफळीने भक्कम खेळ करत आयकॉन पब्लिक स्कूलला एकही गोल करू दिला नाही. त्यामुळे ऊर्जा गुरुकुलने 1-0 असा महत्त्वपूर्ण विजय मिळवला.


14 वर्षांखालील गटात आयकॉन पब्लिक स्कूल आणि अशोकभाऊ फिरोदिया स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आयकॉनने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सामन्याच्या 14व्या मिनिटाला लोकेश मुनोत याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आयकॉनच्या बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. परिणामी आयकॉन पब्लिक स्कूलने 1-0 असा विजय नोंदवला.


दुपारच्या सत्रात 16 वर्षांखालील गटात आयकॉन पब्लिक स्कूल आणि अशोकभाऊ फिरोदिया स्कूल यांच्यात सामना झाला. या सामन्यात आयकॉनचा संपूर्ण वर्चस्वपूर्ण खेळ पाहायला मिळाला. भार्गव पिंपळे याने 10व्या आणि 42व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल करत संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. अशोकभाऊ फिरोदिया स्कूलला एकही गोल करता आला नाही आणि आयकॉन पब्लिक स्कूलने 2-0 असा दिमाखदार विजय मिळवला.


12 वर्षांखालील गटात आठरे पाटील स्कूलने ऑक्झिलियम कॉन्व्हेंटवर 1-0 असा विजय मिळवला. सामन्याच्या 38व्या मिनिटाला साईराज तागड याने केलेला गोल निर्णायक ठरला.
14 वर्षांखालील गटात आठरे पाटील स्कूल आणि ऑक्झिलियम कॉन्व्हेंट यांच्यातील सामना अतिशय चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी अनेक आक्रमणे केली, मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामना गोलशून्य बरोबरीत संपला.
16 वर्षांखालील गटात मात्र आठरे पाटील स्कूलने जबरदस्त आक्रमक खेळ करत ऑक्झिलियम कॉन्व्हेंटवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. अशोक चंद याने 33व्या आणि 34व्या मिनिटाला सलग दोन गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संग्राम लाटे याने शानदार हॅट्‌ट्रिक साकारत 35व्या, 42व्या आणि 50व्या मिनिटाला गोल नोंदवले. या शानदार विजयामुळे आठरे पाटील स्कूलने स्पर्धेतील आपली विजयी मालिका कायम राखली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *