एसटी को-ऑप बँकेच्या वतीने 60 निवृत्तांचा सपत्निक सत्कार
लाखो प्रवाशांच्या जीवनाशी जोडलेल्या एसटी महामंडळाला बळकटी देण्याऱ्या सेवानिवृत्तांचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घ, प्रामाणिक आणि समर्पित सेवेला मानवंदना देण्यासाठी एस.टी. को-ऑप बँक लि.च्या अहिल्यानगर व श्रीरामपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एसटी महामंडळातील विविध आगारातून निवृत्त झालेल्या सुमारे 60 कर्मचाऱ्यांचा सपत्निक सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती, कामगार अधिकारी बाळासाहेब एकशिंगे तसेच एसटी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व प्राथमिक शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत जगताप उपस्थित होते.
एसटी को-ऑप बँकेचे संचालक बालाजी शिंदे आणि प्रवीण जाधव यांच्या हस्ते निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सत्कारप्रसंगी मान्यवरांनी निवृत्त कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या सेवेला कृतज्ञतापूर्वक सलाम केला. याशिवाय एसटी बँकेचे शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना आणि एसटी मधील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्तांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संचालक बालाजी शिंदे म्हणाले की, “एसटी महामंडळ ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून लाखो प्रवाशांच्या जीवनाशी जोडलेली सेवा आहे. या सेवेला बळकटी देण्यासाठी आपल्या सर्व निवृत्त सहकाऱ्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. आज आपण ज्या ठिकाणी आहोत, त्यामागे त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या सेवेला सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संचालक प्रवीण जाधव म्हणाले की, सेवानिवृत्त कर्मचारी हे संस्थेची खरी संपत्ती असतात. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ पुढील पिढीला मिळणे आवश्यक आहे. एसटी को-ऑप बँकेच्या सभासदांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
एसटी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुर्यकांत जगताप यांनी नोकरीतील निवृत्ती हा शेवट नसून जीवनातील एका नव्या पर्वाची सुरुवात असते. सेवाकाळात मिळवलेला अनुभव, शिस्त आणि कार्यनिष्ठा हीच निवृत्तीनंतरची सर्वात मोठी संपत्ती असते. निवृत्त कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्य, कुटुंब आणि आरोग्य यांना प्राधान्य देत आनंदी जीवन जगण्याचा त्यांनी सल्ला दिला.
कार्यक्रमात बोलताना संचालकांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली. तसेच बँकेच्या माध्यमातून सभासदांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी दोन्ही संचालकांनी एसबीआयच्या नियमांनुसार सभासदांसाठी विना जामीन कर्ज योजना तसेच विमा सुरक्षा योजना लवकरात लवकर लागू करण्याचे आश्वासन दिले.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात निवृत्त कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. निवृत्तीनंतरचे जीवन आनंदी, निरोगी आणि समाधानकारक जावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शाखा व्यवस्थापक भालसिंग यांनी मानले.

