• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

नागरदेवळे येथे ज्येष्ठांची नेत्र तपासणी; 57 रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया

ByMirror

Apr 10, 2026
नेत्रदान व अवयवदानाची जागृती

नेत्रदान व अवयवदानाची जागृती


महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा उपक्रम


महापुरुषांच्या विचाराने फिनिक्सचे कार्य -नेताजी भाबड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सप्ताहानिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नेत्रदान व अवयवदानाची जागृती करुन ज्येष्ठांची विविध आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.


महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड, कामगार तलाठी आदिनाथ निकम, धनराज गांधी, डॉ. विशाल घंगाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड म्हणाले की, नेत्रदान व अवयवदान चळवळ गतीमान होण्यासाठी फिनिक्सचे योगदान सुरु आहे. महापुरुषांनी तत्कालीन सामाजिक प्रश्‍न व वंचित घटकांसाठी कार्य केले. त्यांचा आदर्श ठेऊन काळाची गरज बनलेल्या आरोग्य प्रश्‍नावर फिनिक्सचे कार्य दिशादर्शक असून, या शिबिराच्या माध्यमातून गावाचे नाव देश पातळीवर पोहचले असल्याचे त्यांनी सांगितले.


कामगार तलाठी आदिनाथ निकम म्हणाले की, फिनिक्सच्या माध्यमातून अनेक दृष्टीहीन व्यक्तींना नवदृष्टी मिळाली आहे. अंधकारमय जीवन बनलेल्या सर्वसामान्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य फिनिक्स फाऊंडेशन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनने अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. डोळे कृत्रिमरित्या तयार होत नसून, मरणोत्तर नेत्रदान झाल्यानेच अंधाचे जीवन प्रकाशमान होणार असल्याचे सांगून त्यांनी महापुरुषांच्या विचाराने फिनिक्सच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे सांगितले.


नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये 409 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. 57 रुग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटल मध्ये मोतीबिंदू, काचबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी शिबिरातील गरजूंना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे रक्तदाब, मधुमेह आणि इतर तपासण्या करण्यात आल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, राजेंद्र बोरुडे, रवी बालटे, ओम बोरुडे यांच्यासह बुधराणी हॉस्पिटलचे सचिन पगार, विशाल भिंगारदिवे, फिनिक्सचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *