• Fri. Jul 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या 50 व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेने रचला इतिहास

ByMirror

Jul 30, 2026
हजारो विद्यार्थ्यांच्या दिमाखदार सहभाग; चार दशकांच्या शैक्षणिक कार्याचा सुवर्णमहोत्सवी टप्पा

हजारो विद्यार्थ्यांच्या दिमाखदार सहभाग; चार दशकांच्या शैक्षणिक कार्याचा सुवर्णमहोत्सवी टप्पा


“एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने महाराष्ट्रासह देशात शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.” -आमदार अमोल खताळ


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, गणितीय कौशल्य आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने गेल्या 43 वर्षांपासून अबॅकसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण केली आहे. 50व्या राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन ही केवळ स्पर्धा नसून भारतीय शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी चळवळ आहे. अकॅडमीने जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने उंचावले आहे.”असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.


एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या 50व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी श्री खताळ बोलत होते. यावेळी IPS परीक्षा उत्तीर्ण कु. ऋतुजा गायकवाड, अधिव्याख्याता डॉ. गणेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक विद्या झाडे,ॲड. मिनल देशमुख, केंद्रप्रमुख आशा घुले, विश्‍वनाथ खिल्लारी, रोहिणी खतोडे, मुख्याध्यापक गायकवाड, सुनीता वाकचौरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि अबॅकस मण्यांच्या पवित्र पाटीच्या पूजनाने झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांचा अकॅडमीच्या वतीने सन्मान करण्यात आला. वंदना थोरात यांनी स्वागत व प्रास्ताविकातून एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचा 43 वर्षांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास, विद्यार्थी घडविण्याची परंपरा आणि राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय यशाचा आढावा मांडला.या प्रसंगी अबॅकस विषयातील जगातील पहिली पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या अकॅडमीच्या मार्गदर्शिका डॉ.सौ.कल्पना अशोक घडेकर-कार्ले यांचा विशेष गौरव करण्यात आला.


कार्यक्रमातील सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अबॅकस डेमो प्रात्यक्षिकात हजारो विद्यार्थ्यांनी अवघ्या काही क्षणांत अवघड गणिती उदाहरणे सोडवून उपस्थितांना अचंबित केले. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, वेग आणि गणितीय अचूकता पाहून उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
एव्हरेस्ट आदर्श शिक्षिका पुरस्काराने रोहिणी शिंदे व वैशाली साळुंखे,एव्हरेस्ट स्टार टीचर अवॉर्डने ननिका थोरात, रायझिंग वुमन स्टार अवॉर्डने विद्या देशमुख, तर एव्हरेस्ट गॅलेक्सी टीचर अवॉर्डने वंदना थोरात यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


लहान गटामध्ये वेदश्री पाटील, देवांश बेडवाल, श्रेया गाडगे, प्रतीक भोसले, ऋषिकेश गीते, मानसी इरांडे, शौर्य पोदार, गार्गी दाभाडे, श्‍लोक शिंदे, आरोही शेळके, शार्विल कवडे, आर्यन लांडे, जय गाडगे, वेदांत वाडिया, कस्तुरी माने, वैभवी कोरडे आणि कृष्णा दिघे यांनी चॅम्पियनशिप पटकावली.मोठ्या गटात सर्वज्ञ वाळे, आराध्या तरहाळ, शिवम देशमुख, अपेक्षा एरंडे, कस्तुरी आरोटे, वेदांत सौर, स्वरांगी हसे, आराध्या वर्पे, अवनी मरकड, इशिता गडाख, स्वरा गुंजाळ आणि अमिरा शेख यांनी उत्कृष्ट यश संपादन करत विजेतेपद पटकावले.


अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांसह विविध भागांतून आलेले शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात शैक्षणिक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. शिस्तबद्ध नियोजन, भव्य आयोजन आणि दर्जेदार व्यवस्थापनामुळे उपस्थित मान्यवरांनी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या कार्याचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागूल यांनी केले, तर अशोक घडेकर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *