• Fri. Apr 24th, 2026

महापुरुषांना केवळ नाम घोषापुरते मर्यादा ठेवू नका -डॉ. मिलिंद कसबे

ByMirror

Apr 24, 2026

अहिल्यानगरच्या सैनिकी कॅम्प मध्ये शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा जागर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतीबा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचून समजून घेणे काळाची गरज आहे. आपल्या महापुरुषांना केवळ श्रद्धेचा विषय बनवू नका किंवा त्यांना केवळ नामघोषात अडकवू नका; तर ते विचार कृतीचा भाग बनवा, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद कसबे यांनी केले.


अहिल्यानगर येथील सैनिकी कॅम्प मध्ये आयोजित केलेल्या संयुक्त जयंती सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. कसबे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्या महापुरुषांना जाती-जातीत बंदिस्त केल्याने मोठी संस्कृतिक हानी झाली आहे. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांनी कोणत्या जातीचा द्वेष केला नाही. मात्र प्रत्येक जातीत असलेल्या दैववादी, अंधश्रध्देला त्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांचे कार्य व्यापक होते, असे ते म्हणाले.


पुढे त्यांनी सांगितले की, भारताच्या कृषी धोरणाचा तसेच व्यापार आणि उद्योगाचा पाया महात्मा फुले यांनी रचला आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या वीज, जल आणि कृषि धोरणत फार मोलाचे योगदान आहे. म्हणून या दोन्ही महापुरुषांचे भारताच्या पायाभूत विकासात अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे आहे. तरुणांना मोफत सैनिकी शिक्षणाबद्दल डॉ. आंबेडकरांनी आग्रह धरला होता. त्यांच्या कुटुंबात सैनिकी वारसा होता, त्यामुळे भारताच्या सुरक्षा आणि संरक्षणाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूलभूत चिंतन केले आहे. ते आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजे असे विचार डॉ. कसबे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले.


अहिल्यानगर येथील संरक्षण नियंत्रणालयाच्या व्यतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे अध्यक्ष विभागाचे कंट्रोलर ब्रिगेडियर राजू चावला हे होते. या प्रसंगी भाऊसाहेब गायकवाड यांची यू.पी.एस.सी. मध्ये निवड झाल्याबद्दल विशेष पाहुणे म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गिर्यारोहण प्रेमी व उद्योजक नितीन अवचर व दिलीप गायकवाड, पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश भोसले यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *