घराणेशाहीला थारा न देता सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्या; ॲड. सुरेश लगड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अध्यक्षपदावरून चर्चेला उधाण आले आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विविध राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच, बिनविरोध निवडणुकीच्या नावाखाली पुन्हा घराणेशाहीला आणि मोजक्या राजकीय घराण्यांच्या वर्चस्वाला खतपाणी घालू नये, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुरेश लगड यांनी मांडली आहे.
जिल्ह्यातील विविध सत्ताकेंद्रांवर अनेक वर्षांपासून काही ठराविक राजकीय घराण्यांचे वर्चस्व असल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, विविध राजकीय पदे आणि सत्ताकेंद्रांमध्ये त्याच कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींना सातत्याने संधी मिळत असल्याचे चित्र असल्याचा दावा ॲड. लगड यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पुन्हा त्याच राजकीय घराण्यात फिरू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यास आपला विरोध नाही, असे स्पष्ट करताना ॲड. लगड यांनी बिनविरोध निवडणूक ही सहकाराच्या व्यापक हितासाठी असावी; मात्र एखाद्या व्यक्तीला किंवा राजकीय घराण्याला अध्यक्षपद देण्यासाठीची तडजोड ठरू नये, असे म्हटले आहे.
बँकेच्या अध्यक्षपदासाठी संभाव्य नावांबाबत चर्चा सुरू झाली असतानाच त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला आहे. एखाद्या उमेदवाराच्या नावाला विरोध असेल, तर संबंधित व्यक्तींनी निवडणूक लढवू नये आणि निवडणूक लढविणार असतील तर अध्यक्षपदाची मागणी करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व घटकांनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. मात्र, या सामंजस्याचा फायदा घेऊन आधीच सत्तेची अनेक पदे भूषविणाऱ्या राजकीय घराण्यांनाच पुन्हा महत्त्वाचे पद देणे योग्य ठरणार नाही, असेही ॲड. लगड यांनी स्पष्ट केले.
‘कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?’
वर्षानुवर्षे पक्षासाठी, सहकार क्षेत्रासाठी आणि समाजासाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी कधी मिळणार, हा खरा प्रश्न असल्याचे ॲड. लगड यांनी म्हटले आहे.
“एका घरातील एक व्यक्ती पदावर, दुसरी सत्ता केंद्रात आणि तिसरी राजकारणात सक्रिय, अशा पद्धतीने सत्तेची पदे घरातच फिरत राहिली तर सामान्य कार्यकर्ता शेवटी केवळ झेंडे आणि खुर्च्या लावण्यासाठीच उरणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजकारणात नव्या नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक आहे. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने अनेक वर्षे पक्षाचे, सहकाराचे आणि समाजाचे काम केले असेल, तर त्यालाही नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे. घराण्याच्या नावावर नव्हे, तर कार्यकर्त्याच्या कामाच्या बळावर पद मिळाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पुढाकार घेत असतील, तर त्यांनी घराणेशाहीला प्रोत्साहन न देता सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सहकार क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळेल, अशी भूमिका घ्यावी, अशी मागणी ॲड. सुरेश लगड यांनी केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ राजकीय सत्ता मिळविण्याचे केंद्र नसून शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेली महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे बँकेचे नेतृत्वही व्यापक सहकार क्षेत्राचा विचार करणारे आणि सर्व घटकांना सोबत घेणारे असावे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या मागणीत म्हटले आहे.
‘घराण्याच्या बळावर नव्हे, कामाच्या बळावर नेतृत्व द्या’
घराणेशाही असलेल्या राजकीय कुटुंबातील पुढील पिढीने केवळ घराण्याच्या राजकीय ताकदीच्या आधारावर पुन्हा सत्ता केंद्र बनण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये. सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय दिल्यास नव्या नेतृत्वाला संधी मिळेल आणि जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तन घडू शकते, असा स्पष्ट संदेश ॲड. सुरेश लगड यांनी दिला.
“जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी; मात्र घराणेशाहीच्या किंमतीवर नको,” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.

