संघटनेच्या उपाध्यक्षपदी आनंद लहामगे, सचिवपदी ॲड. सुधीर शेटे व सहसचिवपदी ॲड. निलेश चोरबेले यांची नियुक्ती
शहरात कर परिषदेचे आयोजन करणार -किशोर गांधी
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची नुकतीच शहरात तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्यविषयक योजना, कर सल्लागारांसाठी असलेल्या अडचणी आणि सुधारणा यावर सखोल चर्चा करण्यात आली. संघटनेच्या उपाध्यक्षपदी कर सल्लागार आनंद लहामगे, सचिवपदी ॲड. सुधीर शेटे, तसेच सहसचिवपदी ॲड. निलेश चोरबेले यांची नियुक्ती करण्यात आली. तर कार्यकारिणी सदस्यपदी अशोक धायगुडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
या बैठकीप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष किशोर गांधी, सुनील कराळे, सोहम बरमेचा, अमित पितळे, विजयकुमार भंडारी, सचिन अकोळकर, अंबादास गाजुळ, प्रदीप वावरे, निकेत बोरा, ओमकार गोसावी, पंकज जोशी, सुनील कराळे, पुरुषोत्तम रोहिडा, करण गांधी, सुनील सरोदे, नन्नवरे आदी उपस्थित होते.
किशोर गांधी यांनी पुढील काळात शहरात एक मोठ्या प्रमाणावर कर परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या परिषदेद्वारे व्यापारी वर्ग, सीए, कर सल्लागार आणि सामान्य नागरिक यांना नवीन कर संरचनेतील नियम व अटींची माहिती मिळवता येईल. त्याचप्रमाणे उद्योजक आणि व्यापारी वर्गाला याचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आनंद लहामगे शहरातील कर सल्लागार असून, अनेक वर्षापासून ते सहकारी बँका, संस्था यांचे इनकम टॅक्स, जीएसटीचे काम पाहत आहे. तसेच नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे सहसचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ॲड. सुधीर शेटे हे सहकार क्षेत्रातील सहकारी संस्था व पतसंस्थेचे काम बघत असतात. ॲड. निलेश चोरबेले कर विषयक मार्गदर्शक असून, नवोदित युवकांना ते सातत्याने मार्गदर्शन करत आहे. तर धायगुडे यांची नव्याने कार्यकारणी सदस्यपदी समावेश करण्यात आला आहे.