शहरात नूतन केमिस्ट भवनाचे उद्घाटन; वार्षिक सभेत सर्वानुमते विषय मंजूर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विखे परिवाराशी केमिस्ट बांधवांचे नेहमीच ऋणानुबंध राहिले आहे. सर्व या परिवाराशी जोडलेले आहे. मागील काळात पेशंट चुकला व गोळ्याही चुकल्या. या वेळेस सर्व व्यवस्थित उपचार झाले आहते. सन 2029 ला डॉक्टर व केमिस्ट यांची जोडी सर्व आजारांवर उपचार ठरेल असा विश्वास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बुरुडगांव रोड येथे उभारण्यात आलेल्या नूतन केमिस्ट भवनाचे उद्घाटन अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विखे बोलत होते. याप्रसंगी आमदार सत्यजीत तांबे, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिलजी नावंदर, एम.आय.ओ.सी.डी. सदस्य अजित पारख, उपाध्यक्ष सेंल झोन ऑफ एम.एस.सी.डी.ए. शशांक रासकर, संघटक सचिव चेतनकुमार कर्डिले, औषध निरीक्षक (अन्न व औषध प्रशासन) जावेद शेख, औषध निरीक्षक सोमनाथ मुळे, राजस्थान केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद गुप्ता, संघटनमंत्री अजित पाल, ए.आय.ओ.सी.डी. सदस्य अजित पारख तसेच कै. ओमप्रकाश गुलाटी ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र गुलाटी, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव आबासाहेब बेद्रे व खजिनदार प्रशांत उबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे विखे यांनी भाषणात डॉक्टर हे शरीर तर केमिस्ट हा आत्मा असल्याचे सांगितले. डॉक्टरचे कर्ज केमिस्ट शिवाय फिटू शकत नसल्याचा उपहासात्मक टोला लगावताच सभागृहात एकच हशा पिकली.
आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, केमिस्ट बांधवांचा खरा दैवत रुग्ण आहे. त्याची सेवा या भवनाच्या माध्यमातून झाली पाहिजे. सर्व प्रकारची रुग्णांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. युग बदलले नवनवीन प्रशिक्षण केमिस्ट बांधवांना देण्याचा प्रयत्न राहणार आहे. भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यायचे आहे, यासाठी संघटनेची एकजूट ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, महाराष्ट्रात केमिस्ट्री सर्वात मजबूत संघटना आहे. तालुकास्तरावर केमिस्ट भवन उभारण्यात आलेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रार्इम लोकेशनवर झालेले हे भवन जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांसाठी उपयुक्त ठरणार आहे. केमिस्ट बांधवांसाठी अनेक वर्षापासूनची ही स्वप्नपूर्ती झाली असून, संपूर्ण राज्यात आप्पासाहेब शिंदे यांच्यावर केमिस्ट बांधवांचे मोठे प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर म्हणाले की, नूतन केमिस्ट भवन हे केवळ कार्यालयीन जागा नसून, जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांसाठी संवाद, नियोजन आणि प्रशिक्षण यांचे केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. या भवनामुळे संघटनात्मक कार्य अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, विविध सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व केमिस्ट कार्यकारिणीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष सुर्यकांत भुजाडी, गणेश वाणी, अतुल चांगले, सहसचिव सचिन शिंदे, शहर उपाध्यक्ष भरत सुपेकर, शहर सचिव मनिष सोमाणी, शहर खजिनदार मनोज खेडकर, शहर सहसचिव मनिषा महेश आठरे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, जिल्हा, शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनचे सदस्य आणि संयुक्त केमिस्ट भवन निर्माण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
केमिस्ट असोसिएशनची वार्षिक सभा नक्षत्र लॉन व सांस्कृतिक हॉल येथे आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मागील इतिवृत्त वाचून कायम करण्यात आला. खर्चाला व ताळेबंदला मंजूरी देण्यात आली. सभे पुढील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या सभेसाठी जिल्ह्यातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित महाराज धाडगे यांनी केले. आभार सुर्यकांत भूजाडी यांनी मानले.
