दिव्यांगांसाठी अडथळाविरहित वावर सुनिश्चित करण्यासाठी विविध स्थळांना भेटी
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरमध्ये दिव्यांग व्यक्तींचे सुलभ वावरासाठी सुगम्य यात्रा अभियान 2025 या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग कल्याण आयुक्तालय (पुणे), जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर व जिल्हा पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. केंद्र शासनाच्या उद्दिष्टानुसार सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना अडथळाविरहित वावर मिळवून देण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या अभियानाअंतर्गत, दिव्यांग व्यक्तींना प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे, मॉल्स, कॉलेजेस, सभागृहांमध्ये भेट देऊन, त्या ठिकाणी होणाऱ्या अडचणींविषयी माहिती दिली आणि संबंधित ठिकाणांवर सुगम्यता सुनिश्चित करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यासोबतच एस टू ॲक्सेस ऍपचे प्रचार-प्रसार करण्यात आले.
अभियान काळात, शिर्डी येथील साईबाबा संस्थान, साई तीर्थ पार्क, अहिल्यानगर येथील न्यू आर्टस कॉलेज, माऊली सभागृह, कोहीनूर मॉल आणि शनि शिंगनापूर या धार्मिक आणि शैक्षणिक स्थळांना भेट देण्यात आली. याप्रसंगी सुगम्यता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आणि संबंधित ठिकाणांवर तपासणी करण्यात आली.
या सुगम्य यात्रा अभियानात जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, प्राध्यापिका एल. अनुरुपा, ॲड.लक्ष्मण पोकळे, दिव्यांग कर्मचारी सतीष दगडे, सचिन तरवडे, भाऊसाहेब कदम, गणेश वालझडे, गिन्यानदेव जाधव, विजय बळीद, माधवी कुटे, सुयोग निमसे, डी.डी.आर.सी. चे प्रवीण कांबळे आदी सहभागी झाले होते.