समाजवादी पार्टीचा आरोप
महापालिका प्रशासन अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहे -आबिद हुसेन
नगर (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासन अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे मुस्लिम समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांनी केला आहे. तर नुकतेच पारिजात चौक येथील तांबटकर मळ्यातील खाजगी मालमत्तेवर चालविण्यात आलेल्या जेसीबीच्या कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला आहे.

समाजवादी पार्टीने महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर गंभीर आरोप केला आहे. शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांनी म्हंटले आहे की, महापालिका प्रशासनाने मुस्लिम समाजाला टार्गेट करत जातीयवादी भावनेतून सदर कारवाई केलेली आहे.
पारिजात चौक येथील तांबटकर मळ्याच्या खाजगी मालमत्तेवर टपरी मार्केट उभारलेले होते. यासंदर्भात कोणतीही शहानिशा न करता, तसेच गाळेधारकांना पूर्व नोटीस न देता, पोलीस बळाचा वापर करत अनेक व्यवसायिकांचे गाळे बेकायदेशीरपणे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. शहरातील अनेक विकास कामे प्रलंबित असताना, धार्मिक द्वेष करुन वातावरण दूषित करण्याचे काम महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी करत असल्याचे म्हंटले आहे. अशा गैरकृत्याला समाजवादी पार्टीचा विरोध असून, या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा समाजवादी पार्टीने दिला आहे.