• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाळवणीतील मुरूम प्रकरणी लॅब चाचणीसाठी नमुना पाठवण्याची मागणी

ByMirror

Apr 23, 2026
भाळवणीतील मुरूम प्रकरणी लॅब चाचणीसाठी नमुना पाठवण्याची मागणी

जिल्हा प्रयोगशाळेकडून चाचणीची तयारी; अन्याय निवारण समिती आक्रमक आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे भाळवणी येथील गट क्रमांक 37 पी मधील मुरूम उत्खनन प्रकरण आता चांगलेच तापले असून, संबंधित मुरूमाची लॅब चाचणी करण्यासाठी नमुना तात्काळ पाठवावा, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पारनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून, आदेश तातडीने न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


समितीच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, मौजे भाळवणी येथील गट क्रमांक 37 पी मध्ये अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची तक्रार दि. 5 एप्रिल 2026 रोजी सहाय्यक संशोधन अधिकारी, जिल्हा प्रयोगशाळा, अहिल्यानगर यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 9 एप्रिल रोजी संबंधित विभागाकडून पत्र देण्यात आले असून, मुरूम नमुन्याची प्रयोगशाळा चाचणी करण्यासाठी आवश्‍यक शुल्क भरून नमुना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ (सा.बा.) नाशिक तसेच जिल्हा प्रयोगशाळा (सा.बा.) अहिल्यानगर यांनी तहसीलदार पारनेर व उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर यांना पत्राद्वारे कळविले आहे की, गट क्रमांक 37 पी मधील मुरूमाचा नमुना अधिकृत पद्धतीने संकलित करून प्रयोगशाळेत पाठवावा. त्यानुसार, समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी चाचणी शुल्क भरण्यास तयारी दर्शवली आहे.


तसेच, भाळवणी परिसरातील मंडळाधिकारी व तलाठी यांना अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त करून त्यांच्या उपस्थितीत तसेच समितीच्या प्रतिनिधींसमवेत मुरूम नमुना संकलित करून लॅब चाचणीसाठी पाठविण्याचे आदेश तहसील कार्यालयाकडून तात्काळ देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रशासनाने वेळ न दवडता निर्णय घ्यावा, अन्यथा पारनेर तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *