15 दिवसांत काम सुरू न झाल्यास छावणी परिषदेसमोर प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलन -जालिंदर बोरुडे
जीर्ण शेड, पडलेले गेट आणि पावसात अंत्यविधीसाठी हाल; सामाजिक संघटना आक्रमक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील ऐतिहासिक शुक्लेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, पावसाळ्यात अंत्यविधी करणे नागरिकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. जीर्ण झालेला पत्र्याचा शेड, पडझड झालेला प्रवेशद्वाराचा लोखंडी गेट आणि परिसरातील अपुऱ्या सुविधा यामुळे दुःखाच्या प्रसंगीही नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे छावणी परिषदेने तातडीने लक्ष देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी मागणी विविध सामाजिक संघटना आणि भिंगार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
येत्या 15 दिवसांत दुरुस्तीची कामे सुरू न झाल्यास छावणी परिषद कार्यालयासमोर प्रतिकात्मक अंत्यविधी करून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी दिला आहे. भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिर परिसरातील ही स्मशानभूमी भिंगार पंचक्रोशीसह नागरदेवळे उपनगरातील नागरिकांसाठी अंतिम संस्काराचे प्रमुख ठिकाण आहे. दररोज अनेक अंत्ययात्रा येथे येत असतात. मात्र, अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेला पत्र्याचा शेड पूर्णपणे जीर्ण झाला असून, त्याला अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेडमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने अंत्यविधीची प्रक्रिया सुरळीत पार पाडणे अशक्य होत आहे.
पावसाच्या वेळी अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यानंतरही पाऊस थांबेपर्यंत नागरिकांना मृतदेहासह प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा वेदनादायी प्रसंगी नातेवाईक आणि ग्रामस्थांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या समस्येबाबत छावणी परिषदेकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसामुळे स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी गेटही गंजून कोसळले असून, परिसराच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी छावणी परिषदेकडे नवीन मजबूत व पावसापासून संरक्षण करणारा पत्र्याचा शेड उभारणे, नवीन लोखंडी गेट बसविणे, संपूर्ण परिसराची स्वच्छता करणे तसेच नियमित देखभालीसाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. मानवी संवेदनांशी निगडित असलेल्या या मूलभूत सुविधेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.
–
दुःखाच्या प्रसंगातही नागरिकांचे हाल
शुक्लेश्वर स्मशानभूमी ही भिंगार आणि परिसरातील हजारो नागरिकांच्या अंतिम संस्कारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, जीर्ण झालेल्या शेडमुळे आणि इतर अपुऱ्या सुविधांमुळे पावसाळ्यात अंत्यविधी करणे अत्यंत कठीण झाले आहे. हा केवळ सुविधांचा नव्हे, तर मानवी संवेदनांशी संबंधित प्रश्न आहे. छावणी परिषदेने तातडीने निधी मंजूर करून दुरुस्तीची कामे सुरू करावीत. अन्यथा छावणी परिषद कार्यालयासमोर प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल. -जालिंदर बोरुडे (सामाजिक कार्यकर्ते)

