• Wed. Jul 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

गणेश बनकर यांची विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेच्या प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती

ByMirror

Jul 7, 2026
बनकर यांच्या सामाजिक कार्याची दखल

बनकर यांच्या सामाजिक कार्याची दखल


उपसरसंघचालक संजय जोशी यांचे राष्ट्र उभारणीसाठी युवकांना आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्र उभारणीच्या कार्यात युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेच्या प्रदेश संघटन सचिवपदी अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश विठ्ठल बनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, संघटनात्मक आणि जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक सैनी यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक महासंघाचे उपसरसंघचालक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. समाजहिताची जाणीव, युवकांना विधायक दिशेने प्रेरित करण्याची भूमिका आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील सातत्यपूर्ण सहभाग या बाबींचा विचार करून बनकर यांची प्रदेश संघटन सचिवपदी निवड करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


गणेश बनकर हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून सामाजिक क्षेत्रातही त्यांची सक्रिय ओळख आहे. तसेच ते अखिल भारतीय माळी महासंघात ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. समाजातील उपेक्षित, वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते राजकीय आणि सामाजिक माध्यमातून सक्रियपणे प्रयत्नशील असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.


विश्‍व सनातन धर्म सूर्य सेना ही युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी, भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान आणि संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रदेश संघटन सचिव म्हणून गणेश बनकर यांच्यावर संघटनेच्या विस्तारासह युवकांमध्ये वैचारिक आणि सामाजिक जागृती निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक महासंघाचे उपसरसंघचालक संजय जोशी यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्र उभारणीसाठी युवकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. युवकांना योग्य दिशा देण्यासाठी विश्‍व सनातन धर्म सूर्य सेना सातत्याने कार्यरत आहे. राष्ट्र उभारणीसाठी धर्म, संस्कृती आणि परंपरेचे जतन व संवर्धन प्रत्येक युवकाने स्वतःपासून सुरू करणे आवश्‍यक आहे. धर्म आणि संस्कृती यांचा संबंध केवळ परंपरेशी नसून तो राष्ट्रसेवा, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रीय एकात्मतेशी जोडलेला असावा, ही भावना युवकांच्या मनात रुजविण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय अध्यक्ष दीपक सैनी यांनी गणेश बनकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गणेश बनकर यांच्या या नियुक्तीचे जिल्हाभरातील सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *