• Wed. Jul 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

ByMirror

Jul 7, 2026
विद्यार्थी घडविण्यासाठी पालकांचा देखील शिक्षकांशी समन्वय आवश्‍यक -पद्मकांत कुदळे

विद्यार्थी घडविण्यासाठी पालकांचा देखील शिक्षकांशी समन्वय आवश्‍यक -पद्मकांत कुदळे


कोपरगाव (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय, कोपरगाव येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या पालक मेळाव्यास पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल बॉडी सदस्य पद्मकांत कुदळे हे होते. प्रमुख उपस्थित म्हणून संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संदीप वर्पे, सुरेश बोळीज तसेच माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गजानन जाधव यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, “शाळा आणि पालक हे विद्यार्थ्यांच्या यशरूपी रथाची दोन चाके असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्‍यक आहे,” तसेच घरचा अभ्यास, नियमित उपस्थिती, वाचनाची सवय, शिस्त, स्पर्धा परीक्षा, पायाभूत चाचणी, दप्तराचे ओझे कमी करण्याचे उपक्रम, विद्यार्थी वाहतूक व्यवस्था, स्पोकन इंग्रजी, मिनी गुरुकुल तसेच विषयपत्रिकेवरील सर्व मुद्द्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.


यावेळी पद्मकांत कुदळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जोपासना करण्यासाठी पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन केले. संदीपजी वर्पे यांनी बदलत्या काळात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्ये, आत्मविश्‍वास आणि कौशल्याधारित शिक्षण देण्याची आवश्‍यकता अधोरेखित केली. पालकांनी मुलांना वेळ देऊन त्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.


सुरेश बोळीज यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा व पालक यांच्यातील सुसंवाद आणि समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रभारी प्राचार्य गजानन जाधव यांनी नियमित उपस्थिती, शिस्त, वाचन संस्कृती आणि स्पर्धात्मक वातावरणाची सवय विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून रुजविण्याची आवश्‍यकता स्पष्ट केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंजुषा कुमावत यांनी केले, तर सौ. राजश्री बडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती कावेरी वलटे, सौ. उर्मिला घुले, सौ. संगीता चक्रनारायण, सौ. प्राजक्ता राणे, सौ. माया बनकर, सौ. मीना पावले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *