सराईत गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई व तडीपारीची मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; दहशतीच्या वातावरणाविरोधात महिलांचा आवाज बुलंद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्जेपुरा परिसरात महिलांची छेडछाड, शिवीगाळ, दमदाटी तसेच नागरिकांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत परिसरातील महिलांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. संबंधित सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना तातडीने तडीपार करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली.
महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका भेट घेऊन सर्जेपुरा परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाची माहिती दिली. यावेळी ज्योती चांदणे, सुनिता नाडे, शिताबाई सोनवणे, सरसाबाई आगमणे, सुनिता साठे, परिगा चांदणे, सावित्री शिंदे, रोहिणी ठोकळ यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्जेपुरा येथील महेश भास्कर काळोखे व दीपक काळोखे हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. किरकोळ कारणांवरून नागरिकांना मारहाण करणे, महिलांची छेडछाड करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याच्या धमक्या देणे तसेच दहशतीच्या बळावर नागरिकांना मानसिक त्रास देणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वी कोतवाली पोलीस ठाणे आणि तोफखाना पोलीस ठाण्यात सात ते आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची यादी महिलांनी पोलीस अधीक्षकांना दिली.
महिलांनी सांगितले की, या दोघांच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक भयभीत वातावरणात जीवन जगत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. उलट त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आरोपींवर वारंवार गुन्हे दाखल होऊनही त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करून कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात. तसेच त्यांना तातडीने तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, जेणेकरून परिसरातील नागरिकांना निर्भयपणे जीवन जगता येणार असल्याचे महिलांनी स्पष्ट केले. याप्रकरणी कठोर कारवाई न झाल्यास सर्जेपुरा परिसरातील महिला व ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा दिला आहे.

