युवा उद्योजक संकेत कुलट यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणेतून सलग तिसऱ्या वर्षी राबविला उपक्रम
आतापर्यंत 500 हून अधिक विद्यार्थ्यांना सायकलींचा लाभ; वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला आधार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना शाळेत नियमितपणे जाता यावे, या उद्देशाने बुरुडगाव येथील युवा उद्योजक संकेतभाऊ कुलट यांनी यंदाही सामाजिक बांधिलकी जपत 150 विद्यार्थ्यांना मोफत नवीन सायकलींचे वाटप केले. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासाठी उत्साह निर्माण झाला आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बुरुडगाव येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात नवीन सायकलींचे उत्साहपूर्ण वातावरणात वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना केवळ सायकलीच नव्हे, तर शाळेच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या स्कूल बॅग, वह्या, कंपास बॉक्स तसेच इतर शैक्षणिक साहित्याचेही मोफत वाटप करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सायकल आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विशेषतः वाडी-वस्ती आणि ग्रामीण भागातून दररोज लांब अंतर पायी प्रवास करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरला आहे. आता या विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, नियमित उपस्थिती वाढण्यास आणि शिक्षणात सातत्य राखण्यासही मदत होणार आहे.
संकेतभाऊ कुलट हे गेल्या सलग तीन वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहेत. या कालावधीत त्यांनी 500 हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वितरण करून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा दिली आहे. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाप्रती आपली जबाबदारी त्यांनी या उपक्रमातून जपली आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत जाण्यासाठी वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना सायकलींचा लाभ मिळाल्याने त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनीही कौतुक केले.

