स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत उपक्रम; अहिल्यानगरातील 400 ते 450 कचरा वेचकांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण सुरु
पहिल्या टप्प्यात 174 लाभार्थांना प्रमाणपत्र वितरण व ज्येष्ठ कचरा वेचकांचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी या घटकाअंतर्गत कुशाग्रा इनोव्हेशन फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने शहरातील शहरातील कचरा वेचकांसाठी विशेष प्रशिक्षण, जनजागृती व क्षमता बांधणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहरातील सुमारे 400 ते 450 कचरा वेचकांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात रामवाडी येथील 120 व सिद्धार्थनगर येथील 54, असे एकूण 174 कचरा वेचकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. उर्वरित कचरा वेचकांचे प्रशिक्षण सध्या विविध भागांमध्ये सुरू आहे.
प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन रामवाडी तसेच सिद्धार्थनगर येथे करण्यात आले. प्रशिक्षणाचे मार्गदर्शन कुशाग्रा इनोव्हेशन फाउंडेशनचे प्रशिक्षक बाळकृष्ण यादव व मयूर उडाणशिवे यांनी केले. प्रशिक्षणामध्ये घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छ भारत अभियान, वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता, सुरक्षित कामकाज, सेफ्टी किटचा वापर, पर्यावरण संरक्षण, आर्थिक सक्षमीकरण, बचतीचे महत्त्व, औपचारिक कचरा व्यवस्थापन, आत्मसन्मान, उद्योजकता तसेच सामाजिक सक्षमीकरण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय आयुष्मान भारत योजना, ABHA आयडी, ई-श्रम कार्ड, नमस्ते (NAMASTE) योजना, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM), स्वच्छ भारत अभियान (SBM) तसेच इतर विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान सहभागात्मक उपक्रम, संवाद सत्रे आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून कचरा वेचकांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला तो सौ. अलका बाई काळुंखे यांचा प्रेरणादायी अनुभव. त्यांनी बेंगळुरू येथील ‘हसरू दला’ कचरा वेचक संघटनेच्या अभ्यासदौऱ्याची माहिती देताना सांगितले की, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे विकास उडाणशिवे यांच्या पुढाकारामुळे त्यांना आयुष्यात प्रथमच विमानप्रवास करण्याची संधी मिळाली. या अभ्यासदौऱ्यातून आधुनिक कचरा व्यवस्थापन, कचरा वेचकांचे संघटन आणि त्यांना मिळणारा सामाजिक सन्मान याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अनुभवामुळे उपस्थित कचरा वेचकांना नवी प्रेरणा मिळाली.
समारोपप्रसंगी सहभागी कचरा वेचकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे, टोपी व बॅग यांचे वितरण करण्यात आले. तसेच शहर स्वच्छतेसाठी अनेक वर्षे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कचरा वेचकांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक ऋषिकेश वाल्मीक यांनी कचरा वेचकांच्या कार्याचे कौतुक करत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, अहिल्यानगरचे विकास उडाणशिवे यांनी कुशाग्रा इनोव्हेशन फाउंडेशनचे प्रशिक्षक बाळकृष्ण यादव व मयूर उडाणशिवे, अहिल्यानगर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापक श्री. बिडकर, स्वच्छता निरीक्षक ऋषिकेश वाल्मीक, लक्ष्मण लांडगे, शुभम पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

