‘निवृत्तीनंतर व्यक्तीचे खरे समाजकार्य सुरू होते’-पद्मश्री पोपट पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “निवृत्तीनंतर व्यक्तीचे खरे काम सुरू होते. सेवेतून परिपक्व झालेले व्यक्तिमत्त्व समाजासाठी मार्गदर्शक ठरत असते. संघर्षातून सेवेत आलेली पिढी आता निवृत्त होत असून, ही समाजासाठी मोठी उणीव आहे. नव्याने सेवेत येणारा वर्ग तितकेच संस्कार देईल, याची शाश्वती नाही. मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी कष्टकरी आणि वंचित घटकातील मुलांना घडविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले आहे,” असे गौरवोद्गार पद्मश्री पोपट पवार यांनी काढले.
श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त बंधन लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील होते. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, शिक्षक नेते रा. या. औटी, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे, नगरसेवक बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, अनिल बोरुडे, पुष्कर कुलकर्णी, बाळासाहेब पवार, रोहन सानप, मनोज दुल्लम, विनोद म्याना, मल्हार गंधे, संदीप कर्डिले, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अशोक सब्बन, शरद क्यादर, बाळकृष्ण सिद्दम, शंकर सामलेटी, विनायक गुडेवार, राजेंद्र म्याना, भीमराज कोडम, पद्मशाली स्नेहिता संगमच्या अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ, नूर मोहम्मद पठाण, मनपा विभागाचे कुटे सर, खाजगी अनुदान प्राप्त शिक्षक-शिक्षकेतर महासंघाचे संस्थापक सा. र. तुंगार, राज्य सचिव विठ्ठल उरमुडे, गांधी मैदान येथील मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप छिंदम, प्रा. बत्तीन पोट्यांन्ना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, सूर्यकांत दगडे, स्वप्निक दगडे, संकेत दगडे, निखील दगडे, पद्मश्री विद्या प्रसारक मंडळाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, पद्मशाली स्नेहिता संगमच्या महिला पदाधिकारी व सदस्या, संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात शशिकांत गोरे यांनी विद्या दगडे यांच्या 31 वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा आढावा घेतला. त्यापैकी तब्बल 29 वर्षे त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून कार्य करत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्कार जोपासले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महापालिकेच्या आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर सुजाता सिद्धम यांनी मानपत्राचे वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते विद्या दगडे आणि सूर्यकांत दगडे यांचा सपत्निक शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे पद्मश्री पोपट पवार म्हणाले की, निवृत्तीनंतर प्रत्येक शिक्षकाने आपल्या वयाइतकी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली असून, भावी पिढीचे सुरक्षित आणि आनंददायी भविष्य निसर्गाशी जोडलेले आहे. प्रत्येक धर्म मानवतावाद आणि निसर्ग संरक्षणाचा संदेश देतो. त्यामुळे शिक्षकांनी समाजात पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
अध्यक्षीय भाषणात प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले की, विद्या दगडे यांनी सेवानिवृत्तीनंतर शिक्षण विभागाच्या माध्यमातून बालसंस्कार वर्ग सुरू करावेत. आज छोट्या कुटुंब पद्धतीमुळे अनेक मुलांना आजी-आजोबांचे संस्कार मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीची अतिरिक्त जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. मिशन आपुलकी योजनेअंतर्गत लोकसहभागातून शाळांचा विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. याच वेळी विद्या दगडे यांनी मार्कंडेय विद्यालयासाठी एक लाख रुपयांचे पॅनल बोर्ड भेट दिल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
प्रा. गणेश शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्य करणारा शिक्षक कधीच वृद्ध होत नाही. शिक्षकाची खरी निवृत्ती होत नसते, कारण तो आपल्या विद्यार्थ्यांच्या रूपाने कायम समाजात कार्यरत असतो. अज्ञान दूर करून समाजाला प्रकाश देण्याचे कार्य शिक्षक करतात. शिक्षकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, मात्र कौतुकाची अपेक्षा ठेवू नये. केलेल्या कार्यातून मिळणारे समाधान हेच खरे असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळकृष्ण सिद्दम यांनी विद्या दगडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयात त्यांनी शिस्त, गुणवत्ता आणि कार्यसंस्कृतीचा दरारा निर्माण केला. कोणतेही काम कमीपणाचे न मानता वेळप्रसंगी सर्व जबाबदाऱ्या स्वीकारत त्यांनी विद्यालयाला नावलौकिक मिळवून दिला असल्याचे सांगितले.
संजय वाघमारे म्हणाले की, विद्या दगडे यांनी वंचित आणि कष्टकरी घटकातील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देऊन खाजगी शाळांसमोर सक्षम पर्याय उभा केला. त्यांनी मार्कंडेय विद्यालयाला आदर्श शाळेचा दर्जा मिळवून दिला असून, शाळेसाठी वाहून घेतलेले त्यांचे कार्य सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी विद्यार्थिनी समीक्षा मुत्त्याल, तसेच वैशाली वरुडे आणि संकेत शिंदे यांनी विद्या दगडे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना विद्या दगडे यांनी शाळेच्या स्थापनेपासूनचा संपूर्ण प्रवास उलगडला. एका छोट्याशा खोलीत सुरू झालेली शाळा आज लर्निंग स्कूल, आधुनिक प्रयोगशाळा आणि डिजिटल स्कूलपर्यंत कशी पोहोचली, यातील संघर्ष, सहकार्य आणि अनेक संस्मरणीय प्रसंग त्यांनी भावनिक शब्दांत मांडले. शाळेच्या प्रत्येक विटेशी आणि प्रत्येक विद्यार्थ्याशी जुळलेले नाते आयुष्यभर कायम राहील, असे सांगताना त्या भावूक झाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता भावसार आणि गीतांजली काकडे यांनी केले, तर मिनाक्षी बिंगेवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्कंडेय विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

