• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

वनविकास व वन्यजीवांना आश्रय देण्याची मागणी;

ByMirror

Nov 16, 2025
वनविकास व वन्यजीवांना आश्रय देण्याची मागणी;

वन्य प्राणी नाही, मानव जबाबदार! बिबट्याला गोळी घालण्याचा निर्णय चुकीचा -गोरक्षनाथ गवते

अन्यथा जागतिक पर्यावरण विकास सरकार संस्था न्यायालयात दाद मागणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिरूर तालुक्यात नरबक्षी बिबट्याला गोळी घालून ठार करण्याच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त करत, वन्य प्राण्यांना ठार मारण्यापेक्षा जंगलांचे पुनरुज्जीवन करून त्यांना सुरक्षित आश्रय द्यावा, अशी मागणी जागतिक पर्यावरण विकास सरकार संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांनी केली आहे.


गवते म्हणाले की, “आज महाराष्ट्रात बिबट्याची दहशत वाढली आहे, परंतु ही दहशत बिबट्याने नव्हे तर मानवाने निर्माण केलेली आहे. बेसुमार जंगलतोड, अतिक्रमण आणि वनांचा उध्वस्त झालेला परिसर यामुळे वन्य प्राण्यांना राहण्यासाठी जागाच उरलेली नाही. परिणामी बिबट्यासह इतर प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येत आहेत.”


भारत स्वतंत्र झाल्यावेळी देशात तब्बल 42% वनक्षेत्र होते. ते आज केवळ 0.4% वर आले आहे, अशी आकडेवारी गवते यांनी दिली. “आपण 99% पेक्षा जास्त वनांचा विनाश केला आणि आता बिबट्या गावात आला म्हणून आपण त्यालाच दोष देतो. खरेतर त्याच्या घराचा विनाश करणारे आपणच जनता, शासन, राजकीय नेते, मंत्री आणि प्रशासकीय यंत्रणा,” असा तीव्र शब्दात निषेध गवते यांनी व्यक्त केला.


बिबट्याला ठार मारल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करताना गवते म्हणाले, “कोणालाही बिबट्याला मारण्याचा अधिकार नाही. वनाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. हरणांची संख्या वाढत असताना बिबट्यांची संख्या कमी होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी बिबट्यांची संख्या वाढणे अत्यावश्‍यक आहे.”


गवते यांनी राज्य सरकार, वनमंत्री, पर्यावरण मंत्री, ग्रामविकास विभाग आणि सर्व राजकीय नेत्यांकडे त्वरीत उपाययोजना करण्याचे आवाहन केले. “वन्य प्राण्यांचे निवासस्थान वाढविल्याशिवाय समस्या सुटणार नाही. जंगलांची पुनर्रचना, वृक्षलागवड आणि संवर्धनाचे काम युद्धपातळीवर सुरू केले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.


यापूर्वी अनेकदा उपोषण करूनही शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गवते यांनी केला. आम्हाला न्यायालयाच्या दारात जावे लागू नये, म्हणून शासनाने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा पर्यावरण रक्षकांना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई उभी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *