वंचितांची दिवाळी गोड करण्याचा ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर, मनोरुग्णांसाठी आधार असलेल्या मानवसेवा प्रकल्पात कल्याण-ठाणे येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.3 नोव्हेंबर) भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी दीपसंध्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचे संचालक प्रवीण साळवे यांनी दिली.
सायंकाळी 6 वाजता कवयित्री सरोज आल्हाट व ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सारिका शेलार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमासाठी मेहेर ब्लेस्ड संजीवन वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष महेश पवार, श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे सचिव दिलीप गुंजाळ, पोस्टमास्टर संतोष यादव, पत्रकार अनिल हिवाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
दीपसंध्या कार्यक्रमात विविध हिंदी, मराठी गीतांची सूरमय मैफल रंगणार आहे. मानवसेवा प्रकल्पातील मनोरुग्ण व निराधार महिला-पुरुषांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत ऋतिक बैरागी, सौरभ साठे, सोहम लासूरकर, अक्षय गव्हाणे, सुवर्ण प्रताप हे कलावंत आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होऊन मनोरुग्णांना मानसिक आधार देण्याचे व त्यांच्या दिवाळी गोड करण्याचे आवाहन ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.