बचत गट, गृहउद्योग आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी खुले स्टॉल प्रदर्शन; ‘ऑनलाईन नव्हे, ऑफलाईन खरेदीचे आवाहन
कपडे, ज्वेलरी, हस्तकला ते खाद्यपदार्थांचा 7 व 8 ऑगस्ट रोजी भरणार मेळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्थानिक महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिला गृहउद्योगांना चालना मिळवून देणे तसेच ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळकटी देण्याच्या उद्देशाने राधेय महिला गृह उद्योग यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘आनंद नगरी खरेदी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये महिला बचत गट, गृहउद्योग चालविणाऱ्या महिला तसेच स्थानिक महिला व्यावसायिकांना आपले विविध प्रकारचे स्टॉल उभारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हा दोन दिवसीय खरेदी महोत्सव शुक्रवार, दि. 7 ऑगस्ट आणि शनिवार, दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत जैन स्थानक, शिवगंगा टॉवरजवळ, मार्केटयार्ड, सारसनगर, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनामध्ये शहरातील नागरिकांसाठी विविध प्रकारची उत्पादने आणि खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या महोत्सवात कपडे, ज्वेलरी, हस्तकला वस्तू, ब्युटी प्रॉडक्ट्स, गेम स्टॉल्स तसेच विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपल्या उत्पादनांचे थेट ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्याची आणि नवीन ग्राहकांशी संपर्क वाढविण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे.
महोत्सवादरम्यान महिलांसाठी सोडत पद्धतीने आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले असून त्यामुळे खरेदीसोबतच मनोरंजनाचीही पर्वणी अनुभवता येणार आहे. यावेळी आयोजक उज्वला मालू आणि स्वाती नागोरी यांनी नागरिकांना “ऑनलाईन खरेदीपेक्षा स्थानिक व्यवसायिकांकडून ऑफलाईन खरेदीला प्राधान्य द्या” असे आवाहन केले. स्थानिक व्यावसायिक आणि महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि अनेक महिलांना स्वावलंबी होण्यासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या महोत्सवात स्टॉल उभारण्यास इच्छुक महिला बचत गट, गृहउद्योग चालविणाऱ्या महिला तसेच व्यावसायिकांनी अधिक माहितीसाठी उज्वला मालू (7020352812) किंवा सौ. स्वाती नागोरी (965791106) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

