• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

समाज परिवर्तन संस्थेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा

ByMirror

Nov 27, 2025
संविधान दिन कार्यक्रमात आंबेडकरी विचारांचा जागर

संविधान दिन कार्यक्रमात आंबेडकरी विचारांचा जागर


संविधानाद्वारे राजकीय समतेबरोबर सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्याची गरज -डॉ. भास्कर रणनवरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाज परिवर्तन संस्थेच्या वतीने पाईपलाईन रोड, सावेडी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थितांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले. अशोक बागुल यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. प्रा. भास्कर नरोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी समाज परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, शिवाजी भोसले, दिगंबर ठोंबरे सर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रास्ताविकात शिवाजी भोसले म्हणाले की, भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचे मार्गदर्शक दस्तऐवज असून, सर्व भारतीयांनी आपल्या सर्व व्यवहारांमध्ये घटनेनुसार वर्तन करणे आवश्‍यक आहे.


समाज परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, उद्देश, कार्यपद्धती, इतिहास आणि आजची स्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी संविधान निर्मितीतील दोन प्रमुख समित्या संविधान सभा (अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद) आणि मसुदा समिती (अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर) यांची माहिती दिली. मसुदा समितीतील सुरुवातीच्या सात सदस्यांचे विविध कारणांनी कामात नसणे याचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, अखेरीस संविधान मसुदा तयार करण्याचे संपूर्ण ओझे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरच आले. म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते.


डॉ. आंबेडकर महाराष्ट्रातून संविधान सभेवर निवडून न आल्यानंतर त्यांनी संयुक्त बंगालमधून निवडणूक लढवली. फजलुल हक (तेव्हाचे बंगालचे मुख्यमंत्री), कृषक समाज पार्टी, मुस्लिम लीग यांचे सहकार्य तसेच जोगेंद्रनाथ मंडल यांच्या प्रयत्नांतून जसोर,खुल्ला,बोरीसाल,फरितपूर येथील नमो शूद्र समाजाच्या पाठिंब्याने ते निवडून आले. मात्र 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाची फाळणी झाल्यानंतर त्यांची सदस्यता पाकिस्तानात गेली. त्यानंतर काँग्रेसच्या चर्चेनंतर त्यांना मुंबईतून संविधान सभेत पाठवण्यात आले आणि त्यांच्या बुद्धिमत्ता, आंदोलन व भाषणांमधून झालेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची मसुदा समिती अध्यक्षपदी निवड झाली.


1949 साली संविधान सभेत संविधान सुपूर्त करताना डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या भाषणाचा उल्लेख करत डॉ. रणनवरे म्हणाले की, “ज्यांच्यासाठी हे संविधान निर्माण केले आहे त्यांना सामाजिक आणि आर्थिक समानता प्राप्त झाली नाही तर तेच लोक हे संविधान नष्ट करतील.” त्यामुळे राजकीय समतेबरोबर सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.


यानंतर बौद्धाचार्य संजय कांबळे यांनी संविधानावरील सखोल माहिती देत, तथागत बुद्धिस्ट सोसायटीने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भंतेजी धम्मपाल व श्रामनेर सारीपुत्त उपस्थित होते.


अध्यक्षीय भाषणात प्रा. भास्कर नरोडे सर यांनी संविधानातील विविध कलमे, मूलभूत हक्क, अस्पृश्‍यता निवारण, तसेच शिक्षण व नोकरीतील आरक्षणासंबंधी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश साळवे यांनी केले. आभार प्रदर्शन सेवानिवृत्त जनरल मॅनेजर विजय पाटोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश गायकवाड, अर्जुन कांबळे माजी सैनिक बी.एस.एफ., विनोद साळवे, दिगंबर ठोंबरे, अशोक बागुल, रमेश पगारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *